अलंकापुरीत माउली… माउलीचा गजर

रथोत्सव जल्लोषात : आज श्रींचा 723 वा संजीवन समाधी दिन सोहळा रंगणार

एम. डी. पाखरे
आळंदी- टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली नामाच्या जयघोषात आज (मंगळवारी) लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत द्वादशीनिमित्त माऊलींचा चांदीचा मुखवटा रथामध्ये ठेवून त्याची परंपरेप्रमाणे मिरवणूक काढण्यात आली. “पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’ असा गजर होताच अनेक हात माउलींचा रथ ओढू लागले. अशा भक्‍तिमय वातावरण नगरप्रदक्षिणा पूर्ण करत कार्तिकीवारी सोहळ्यातील रथोत्सवाचा कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. तर बुधवारी (दि. 5) श्रींच 722वा संजीवन समाधी दिन सोहळा रंगणार आहे.
द्वादशी निमित्त माउलींच्या समाधीवर पहाट पूजेत पवमान अभिषेक व दुधारती खेडचे प्रांत आयुष प्रसाद यांचे हस्ते झाली. याप्रसंगी खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले, आळंदीचे मुख्याधिकारी समीर भुमकर, मंडलाधिकारी चेतन चासकर आदी उपस्थित होते. रथोत्सवास माउलींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख विश्‍वस्त विकास ढगे पाटील, विश्‍वस्त अभय टिळक, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, मानकरी व्यवस्थापक माउली वीर, श्रीधर सरनाईक, श्रींचे सेवक दत्तात्रय केसरी, राजाभाऊ चौधरी, क्षेत्रोपाध्ये इनामदार परिवार, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब कुऱ्हाडे, योगेश सुरू, भीमराव घुंडरे, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र चौधरी, पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव, श्रींचे मानकरी, भाविक, वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
आळंदी मंदिरात प्रांत आणि तहसीलदार यांचे परिवाराचे उपस्थितीत पहाटे पूजा परंपरेने उत्साहात झाली. यानंतर भाविकांच्या महापूजा आणि दर्शनासाठी श्रींचा गाभारा भाविकांना खुला झाला. चारच्या सुमारास माउलींचा चांदीचा मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत ठेवून श्रींचा लवाजमा शनिमंदिरमार्गे गोपाळपुऱ्यातील राधाकृष्ण मंदिरात नेण्यात आला. राधाकृष्ण मंदिरात इनामदार कुटुंबीयांच्या वतीने माउलींची विधिवत पूजा परंपरेने पौराहित्यांचे वेदमंत्र जयघोषात झाली. पूजेदरम्यानच्या कालावधीत अनेक वारकरी रथोत्सवात सहभागी होण्यासाठी गोपाळपूरच्या दिशेने आले. पूजा झाल्यानंतर माउलींचा चांदीचा मुखवटा नगरप्रदक्षिणेसाठी रथात ठेवण्यात आला. रथासमोर वारकऱ्यांची दिंडी भगव्या पताका उंचावत माउली… माउलीचा गजर करत होते. गोपाळपुरातील वैभवी श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने श्रींची पूजा, आरती नंतर श्रींच्या रथोत्सवात श्रींची पूजा बांधण्यात आली.श्रींच्या रथोत्सवातील वैभवी रूप पाहण्यासाठी श्रींच्या दर्शनास भाविकांनी तीर्थक्षेत्रातील नगरप्रदक्षिणा मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी केली.
गोपाळपूर, नगरप्रदक्षिणामार्गे, भैरवनाथ मंदिर, हजेरी मारुती मंदिर, नगरपरिषद चौकमार्गे पुढे श्रींचा रथोत्सव श्रींचा शाही लवाजमा हरिनाम गजरात मंदिरात आला. श्रींचे मंदिरात परंपरेने हरिभाऊ बडवे यांचे वतीने कीर्तन सेवा, नगरप्रदक्षिणा करून श्रींच्या रथोत्सवातील पालखीचे मंदिरात आगमन झाले. श्रींची मंदिर प्रदक्षिणेनंतर धुपारती त्यानंतर विणा मंडपात केंदूरकर यांचे वतीने कीर्तनसेवा झाली. परंपरेने मंदिरात रात्री पासधारकांना खिरापत पूजा महाप्रसाद वाटप, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप श्रींच्या गाभाऱ्यात करण्यात आले. आळंदी पोलिसांनी रथोत्सवासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे तर आळंदी नगर पालिकेने रथोत्सव मार्गावर स्वच्छता आणि अतिक्रमाण मोहीम राबवित भाविकांची सेवा रुजू केली. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या 723 व्या संजीवन समाधी दिना निमित्त आळंदीत भरणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आळंदीत आले आहेत. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटकमधील वारकऱ्यांची संख्याही यावर्षी मोठी राहिली. वैष्णवांचा मेळा इंद्रायणी तीरावर तीर्थस्नाना साठी सोहळ्यात जमले. इंद्रायणी नदीला वरील धरणातून पाणी सोडल्याने भाविक वारकऱ्यांचे स्नानाची चांगली सोय झाल्याचे नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.

  • आज नामदेवरायांच्या वंशजांच्या वतीने महापूजा
    श्रींचे संजीवन समाधी दिनानिमित्त बुधवारी (दि. 5) सकाळी दहा ते बारा या वेळेत संत नामदेवांचे वंशज नामदास महाराज यांचे देऊळवाड्यात श्रींचे संजीवन समाधी प्रसंगाची कीर्तनसेवा होणार आहे. यानंतर घंटानाद, पुष्पवृष्टी वर्षाव, आरती होणार आहे. दरम्यान काल्याचे कीर्तनानंतर श्रीगुरु हैबतबाबा यांचे दिंडीची समाधी मंदिर प्रदक्षिणा, श्रींना महानैवेद्य,सोपानकाका देहूकर यांचे वतीने विना मंडपात परंपरेने कीर्तन, धुपारती व हैबतरावबाबा आरफळकर यांचे वतीने हरिजागर होणार आहे. श्रींचे मंदिरात भाविकांचे तसेच नामदेवरायांचे वंशजांचे वतीने श्रींना महापूजा होईल.तत्पूर्वी प्रमुख विश्‍वस्त विकास ढगे पाटील यांचे हस्ते श्रींना पवमान अभिषेक व दुधरती होईल.
-Ads-

पांडुरंगाच्या पादुका दर्शनासाठी गर्दी
पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री पांडुरंगाच्या पादुका यावर्षीही आळंदी कार्तिकी वारीसाठी हरिनाम गजरात आल्या आहेत. इंद्रायणी तीरावरील मल्लाप्पा वासकर महाराज यांच्या फडावर श्री पांडुरंगाच्या पादुका व पालखी दर्शनास भाविकांनी गर्दी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)