#अर्थसार : कागदी नोटांचे मायाजाल! 

यमाजी मालकर 

व्हेनेझुएला देशात 10 लाख पट महागाई होऊ शकते, या बातमीने धडकी भरते. कागदी चलनाचा मारा थांबला नाहीतर अनेक देशांत असे होऊ शकते. नोटबंदीने तो प्रवास आपण लांबणीवर टाकला. पण तेथे न थांबता चलनाच्या मूळ प्रश्‍नाला भिडण्याचे धाडस भारताला आणि जगाला करावे लागणार आहे. 

कागदी नोटांनी जगावर काय वेळ आणली आहे, याचा एक अंक सध्या दक्षिण अमेरिकन देश व्हेनेझुएलात पाहायला मिळतो आहे. चार वर्षांपूर्वीच या संकटाने झिम्बाब्वेच्या चलनाचा बळी घेतला, अखेर आपले चलन सोडून इतर देशांचे चलन त्या देशाला मान्य करावे लागले. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीसारख्या देशाने या वेदना सहन केल्या आहेत. या संकटाला मराठीत पैशीकरण म्हणता येईल. इंग्रजीत त्याला ोपशींळूरींळेप म्हणतात. याचा अर्थ असा की एखादे चलन प्रस्थापित करणे. पण ते करताना खऱ्या मूल्याची जेव्हा फारकत होते, तेव्हा पैशीकरणाचे संकट उभे राहते. असे संकट व्हेनेझुएलामध्ये सध्या उभे राहिले आहे. विश्‍वास बसत नाही, पण बातम्यांत असे म्हटले आहे की तेथे यावर्षी 10 लाख पट महागाई वाढणार आहे ! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने हा अंदाज केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

व्हेनेझुएला देशात उत्पन्नाचा मूळ स्रोत तेलसाठे आहे. पण 2014 मध्ये तेलाच्या किमती इतक्‍या कमी झाल्या की त्या देशाची अर्थव्यवस्था कोसळण्यास सुरुवात झाली. सरकारची तिजोरी रिकामी झाल्यामुळे सरकारने सबसिडी देणे थांबविले तसेच किमतीवर नियंत्रण करणे, सरकारला शक्‍य राहिले नाही. तेथे साम्यवादी व्यवस्था असल्याने अर्थव्यवस्थेवर संपूर्ण नियंत्रण सरकारचे आहे. झिम्बाब्वेमध्ये 2000 साली आणि जर्मनीमध्ये 1923 साली जशी परिस्थिती निर्माण झाली होती, तशीच स्थिती व्हेनेझुएलामध्ये वर्षअखेर निर्माण होईल, असे नाणेनिधीने म्हटले आहे.
व्हेनेझुएलाची आजची स्थिती काय आहे? तेथे प्रचंड महागाई वाढली आहे. यावर्षी ती 46 हजार 305 पट वाढली. ही महागाई किती आहे, याची कल्पना येण्यासाठी भारतातील महागाईच्या प्रमाणाचे उदाहरण आपण घेऊ. भारतात सध्या पाच टक्के महागाई वाढली आहे. त्यात तेलाचा वाटा अधिक आहे. अशा स्थितीत आपल्याला महागाई सहन करणे अशक्‍य होऊन जाते, मग 46 हजार 305 पट महागाई कशी असू शकेल, याच्या नुसत्या कल्पनेने धडकी भरते.

आता हे कशामुळे झाले, हे समजून घेऊ. तेलापासून मिळणारे हक्काचे उत्पन्न कमी झाल्यामुळे सरकारचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्‍न पडला. तेव्हा सरकारने चलन अधिक छापण्याचा निर्णय घेतला. म्हणजे पुरेशी निर्मिती किंवा उत्पादन नसताना नोटा छापण्यात आल्या. चलन किती छापायचे, हा अधिकार सरकारकडे असला तरी मागणी आणि पुरवठ्याचे सूत्र सांभाळले नाही तर अशी परिस्थिती निर्माण होते. नोटांच्या अशा छपाईमुळे व्हेनेझुएलाच्या चलनाचे जगातील मूल्य एकदम घसरले. त्यामुळे जगातून माल आयात करणे कठीण झाले. त्या देशाची आर्थिक स्थिती खालावत गेली. एकदा गाडी उताराला लागली की ती थांबविणे अशक्‍य होऊन जाते, असेच जर्मनी आणि झिम्बाब्वेमध्येही झाले होते. व्हेनेझुएलामध्ये आर्थिक संकटामुळे दंगली होत आहेत. देश अस्वस्थ, अशांत झाला आहे. सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्‍कील झाले आहे.

जगात अशी वेळ आगामी काळात अनेक देशांवर येऊ शकते, याचे कारण अमेरिकेसह जगाने गोल्ड स्टॅंडर्डला दिलेली सोडचिठ्ठी. गोल्ड स्टॅंडर्ड याचा अर्थ देशाच्या तिजोरीत जेवढे सोने ठेवले जाते, तेवढ्या किमतीचे चलन छापणे. सोनेच का, कारण सोने जगात कमी आहे. त्यामुळे ते मौल्यवान आहे. वेगळ्या भाषेत ती रियल व्हॅल्यू आहे. जशी जमिनीला आहे, पाण्याला आहे, खनिज संपत्तीला आहे. अन्नधान्याला आहे. पूर्वी जेव्हा कागदी चलन वापरात आले नव्हते, तेव्हा अन्नधान्याच्या देवघेवीवरच जग चालत होते. व्यापाराचा विस्तार झाल्यामुळे सोने-चांदीसारखे धातू देवघेवीसाठी वापरले जाऊ लागले. पण तेही सोयीचे ठरत नाहीत, हे लक्षात आल्यावर सध्याच्या चलनाचा जन्म झाला.

पण जोपर्यंत म्हणजे 60 वर्षापूर्वी त्याच्या पाठीशी सोने होते, (गोल्ड स्टॅंडर्ड) तोपर्यंत चलनवाढ या वेगाने होत नव्हती. चलन छापण्यासाठी सोने तिजोरीत ठेवायचे म्हणजे तेवढ्या किमतीचे उत्पादन आधी करावे लागत होते. चलन छापण्यासाठी प्रत्येक देश आपले काही निकष आताही पाळत असला तरी त्या त्या देशांनी त्यात आपल्या सोयीने बदल केले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात किती चलन छापले जाते आहे, हे गुलदस्त्यातच आहे. झिम्बाब्वेमध्ये गेल्या दशकात तेच झाले. एक अब्ज झिम्बाब्वेन डॉलरची नोट घेऊन लोक हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ लागले! कागदी नोटांना काही किंमतच राहिली नाही.

या संकटापासून वाचण्याचा एकच मार्ग म्हणजे चलन आणि उत्पादन याचा संबंध कायम ठेवणे आणि ही आर्थिक शिस्त न मोडणे. आपल्या देशात 500 आणि हजार रुपयांच्या स्वरूपातील चलन एकूण चलनाच्या 86 टक्के होते आणि त्यामुळे रोखीचे व्यवहार माजले होते. त्यामुळेच घरे, जमिनी याचे दर प्रचंड वाढले होते. ज्यांना कागदी नोटा कमावण्याची अक्कल आहे, तो शहाणा आणि श्रीमंत. त्यामुळे कागदी नोटांचा वापर करून आपल्याकडे गेल्या काही वर्षात निसर्गाची प्रचंड लूट केली गेली. जमिनीची मालकी नोकरदार आणि उद्योजक, व्यावसायिकांकडे जाते आहे, त्याचेही हेच कारण आहे. ज्यावेळी धान्य हाच पैसा होता, त्यावेळी शेतकरी श्रीमंत होता. आता शेतकऱ्याला इच्छा असो नसो, बाजारात जाऊन कागदी नोटा कमवाव्या लागतात. मानवी आयुष्याचे हे जे पैशीकरण झाले आहे, ते मोठे संकट असून चलनाला काबूत ठेवणे ही आजची गरज आहे. नोटबंदीने ते काम केले आहे. विकासाचा वेग कमी झाला, जमीन आणि घरांच्या किमती कमी झाल्या, सोन्याची आयात कमी झाली, अशी तक्रार काहीजण करतात, पण ती गरज होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेची सूज कमी झाली.

अर्थात, जगाचे चलन एक असले पाहिजे, इथपर्यंत हा प्रवास गेला पाहिजे. पण आज तो अनेकांना फार लांबचा पल्ला वाटतो. वास्तविक मानवी आयुष्याचे ज्या वेगाने पैशीकरण होते आहे, ते पाहता ते फार लवकर व्हायला हवे आणि जगाची गरज म्हणून ते होईलच. जर्मनी, झिम्बाब्वे, व्हेनेझुएलात जे झाले ते भारतात होऊ नये, याचा मार्ग चलनाच्या वापरावर नियंत्रण हवे. ते कसे शक्‍य होईल, ते अर्थक्रांती बॅंक व्यवहार कराच्या मार्गाने सांगते. आर्थिक साक्षरतेत आपला समाज कमी पडत असल्याने त्याचे महत्त्व आज आपल्याला नाही. पण नजीकच्या भविष्यात साऱ्या जगाला त्यावरच चर्चा करून पुढे जावे लागेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)