अर्थसंकल्पाच्या तरतुदींतील गुंतवणूक संधी (भाग-२)

अर्थसंकल्पाच्या तरतुदींतील गुंतवणूक संधी (भाग-१)

त्याचप्रमाणं या अर्थसंकल्पातील तरतूदींमुळं ज्या घटकांना फायदा होणार आहे अशांवर एक नजर टाकू.

शेतकरी – अपेक्षेनुसार, मोदी प्रशासनानं देशाच्या शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली आहे, फूल ना फुलाची पाकळी अशा स्वरूपाची जरी ती योजना असली तरी नक्कीच त्याचा काही प्रमाणात उपयोग हा बाजारास होणार आहे. दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतक-यांना दरवर्षी ६,००० रुपये मिळतील. आता या रुपड्यांत त्यांच्या कोणत्या गरजा भागणार हे फक्त त्यांनाच (म्हणजे शेतकऱ्यांनाच) माहिती असलं तरी कमीतकमी दरमहिन्याचा मोबाईल पॅकचा खर्च त्यातून नक्कीच निघू शकतो, अहो हेही नसे थोडके !

करदाते – पुढील आर्थिक वर्षात पांच लाख रुपये एकूण वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीस परताव्याच्या रूपात १२५०० रुपयांचा लाभ होणार असून ही जास्तीची रक्कम त्या व्यक्तीस इतरत्र गुंतवणूक अथवा खर्च करण्यास मिळणार आहे. एकूण अशा व्यक्तींची संख्या लक्षात घेता एकूण रकमेचा अंदाज येऊ शकतो. जास्तीची गुंतवणूक जर बाजारात आली तर नक्कीच बाजारास त्याचा हातभार लागणार आहे. अथवा अशी रक्कम खर्च केली गेल्यास लोकांची क्रयशक्ती वाढून उपभोग्य क्षेत्रास त्याचा हातभार लागणार आहे. अथवा अशी रक्कम आयुर्विम्याचा अथवा आरोग्यविम्याचा हफ्ता भरण्यास कामी येऊ शकते, कमीत कमी या रकमेच्या आधारे ज्या व्यक्तींचा असा विमा नसेल ते लोक त्या दृष्टीनं विचार करून त्या दिशेनं एक पाऊल टाकू शकतात. यांसंबंधित कंपन्या म्हणजे एचडीएफसी एएमसी, ज्युबिलंट इंडस्ट्रीज, हिंद-युनिलिव्हर, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, अपोलो हॉस्पिटल, इ.

ग्रामीण भारत – पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रांवर वाढवलेला खर्च आणि लहान आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांसाठी व्याज अनुदान योजना यांचा एकत्रित लाभ ग्रामीण भारताला होऊ शकतो. संबंधित कंपन्या म्हणजे, डाबर, महिंद्र &महिंद्र, ईपीसी, अवंती फीड्स, हिरोमोटोकॉर्प, इ.

स्थावर मालमत्ता – सरकारनं परवडणाऱ्या गृहनिर्माण योजनांसाठी नव्या उपायांची घोषणा केलीय व त्यासाठी भांडवली लाभात तरतूदही केलीय.यादृष्टीनंलाभार्थी कंपन्या म्हणजे डीएलएफ, एचडीएफसी, गृह फायनान्स, इ.

एकूणच पुढील कांही दिवस या अर्थसंकल्पाचा परिणाम बाजारावर राहील, आणि त्यातच या आठवड्यात म्हणजे ७ फेब्रुवारीस असलेली रिझर्व्ह बँकेची सहावी द्विमासिक पतधोरण बैठक पुन्हा बाजाराचा रोख ठरविण्यात महत्वाचा वाटा उचलेल असं दिसतं. तूर्तास तरी निफ्टी ५० ही १०६०० ते ११००० या दरम्यान दोलायमान राहील असं वाटत आहे, परंतु कोणत्याही बाजूस वरील पातळ्या ओलांडल्यास पुन्हा त्या दिशेनं मार्गक्रमण करण्यास अधिक वाव संभावतो.

एक मात्र नक्की, ऐकण्यास गोड लागलेलं, जिभेला रुचेल व पोटाला पचेल असं काही नसतं, त्यामुळं काही काळ काठावर बसून लक्ष्याकडं लक्ष ठेऊन वाट पाहणं हेच काय ते आपल्या हाती आहे, बघा पटतंय का !

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)