#अर्थवेध: जेफ बेझॉस आणि अतिश्रीमंतांची समाजसेवा! 

यमाजी मालकर 
सक्षम सरकारी व्यवस्थेची जागा समाजसेवेने भरून काढणारे श्रीमंत जगात वाढत चालले आहेत. अशा समाजसेवेऐवजी गरज आहे ती सर्वांना समान संधी देणारी व्यवस्था कशी निर्माण होईल, यासाठी धोरणात्मक बदल घडवून आणण्याच्या पुरुषार्थाची. 
अमेझॉन या अमेरिकन कंपनीचा मालक जेफ बेझॉस हा सध्या जगातला सर्वांत श्रीमंत माणूस असून त्याची संपत्ती 162 अब्ज डॉलर इतकी आहे. म्हणजे 11 हजार 376 अब्ज रुपये. एवढ्या साऱ्या संपत्तीचे करायचे काय, असा प्रश्‍न त्याला पडला आहे. त्यामुळे त्याने त्यातील दोन अब्ज डॉलर म्हणजे साधारण बारा हजार कोटी रुपये समाजसेवेसाठी बाजूला काढले आहेत. अमेरिकेत ही पद्धतच आहे. भांडवलशाही पद्धतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आधी खूप संपत्ती कमवायची आणि नंतर ती समाजासाठी वापरायची. गेल्या शतकाच्या सुरुवातीला जॉन डी. रॉकफेलर नावाचा उद्योगपती होऊन गेला. त्याची संपत्ती त्यावेळच्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या दोन टक्‍क्‍यांहूनही अधिक झाली होती. आज तेवढा श्रीमंत माणूस अमेरिकेतही होऊ शकत नाही, कारण शिक्षण, तंत्रज्ञान आणि लोकशाहीच्या मार्गाने काही प्रमाणात का होईना, पण संपत्तीचे वितरण झाले आहे. त्यातील मोठा वाटा अजूनही ठराविक 5 टक्‍के लोकांच्या हातात आहे, हा भाग वेगळा.
जेफ बेझॉस यांनी गेल्या वर्षी समाजाला आवाहन केले आणि “कोणत्या क्षेत्रासाठी आपण पैसा द्यावा’, असे सुचविण्यास सांगितले. त्यातून जो प्रतिसाद मिळाला, त्यानुसार ज्यांना घरे नाहीत आणि ज्या मुलांना शालेय शिक्षणही घेता येत नाही, अशांसाठी हा निधी देण्याचे त्यांनी निश्‍चित केले. कमीतकमी काळात प्रचंड संपत्ती कमावण्याची उदाहरणे जगात कमी नाहीत. विशेषत: तंत्रज्ञानामुळे ते आता सोपे झाले असून त्याला जागतिकीकरणाने अधिकच चालना दिली आहे. त्यामुळे अख्खे जग म्हणजे गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, सॅमसंग आणि अमेझॉनसारख्या कंपन्यांची बाजारपेठ झाले आहे. जगात चालू शकणारी एक संकल्पना मांडायची, तिला तंत्रज्ञानाचे आणि चांगल्या मनुष्यबळाचे इंजिन लावायचे, खरेदी-विक्रीची व्यक्‍तीनिरपेक्ष साचा तयार करायचा आणि भांडवलाच्या जोरावर जगभर व्यापार करायचा, अशी ही पद्धत आहे. हेच मॉडेल त्या-त्या देशातील मोठ्या कंपन्यांनी उचलले असून त्याही याच पद्धतीने संपत्ती कमावत आहेत.
साधा व्यवहार म्हणून या सर्व प्रक्रियेकडे पाहिले की, यात वावगे असे काही वाटत नाही. पण खोलात गेले की लक्षात येते, ते म्हणजे अशा कंपन्यांच्या मालकांनी त्या-त्या समाजाचेच भांडवल, हे साम्राज्य उभे करण्यासाठी वापरलेले असते. त्या-त्या देशातील सरकारी धोरणे अनुकूल करून आपल्या व्यापाराचा विस्तार त्यांनी करून घेतलेला असतो. त्या देशाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा ते घेत असतात आणि सरकारने उभ्या केलेल्या पायाभूत सुविधेचे ते सर्वांत अधिक लाभधारक असतात. अशा पायाभूत सुविधेच्या जाळ्याशिवाय ते त्यांच्या व्यापाराचा विस्तार करूच शकत नाहीत.
समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखली गेली तरच व्यापारउदीम सुरळीत होऊ शकतो. म्हणजेच या कंपन्यांचे मालक कितीही हुशार, मेहनती आणि कार्यक्षम असले तरी तेवढ्या वैयक्‍तिक भांडवलावर संपत्ती इतक्‍या वेगाने वाढू शकत नाही. सरकार आणि समाजाची साथ नसेल तर असे गडगंज श्रीमंत निर्माणच होऊ शकत नाहीत. बेझॉससारखी माणसे हुशार असतात आणि त्यामुळेच हे सर्व घटक आपल्याला पूरक असल्याने आपण इतके श्रीमंत झालो, याची त्यांना जाणीव असतेच. ही जाणीव त्यांना शांत बसू देत नाही म्हणून किंवा आता त्यांना प्रतिष्ठा हवी असते, म्हणून ते समाजासाठी काम करण्याचा निर्णय जाहीर करतात. आपल्या संपत्तीतील काही भागाची समाजसेवेसाठी तरतूद करतात. त्यामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी तर मिळतेच, पण केवळ व्यापार करताना ज्या सन्मानापासून ते दूर असतात, तो सन्मानही त्यांना काही प्रमाणात मिळू लागतो.
बिल गेट्‌स, वॉरेन बफे यांनीही तेच केले आणि आपल्याकडील उद्योगपती आणि अनेक अतिश्रीमंत तेच करत आहेत.
पण खरोखरच जगाला अशा समाजसेवेची गरज आहे? या प्रश्‍नाचे थेट उत्तर “नाही’ असे आहे. गरज समाजसेवेची नाही, गरज माणसांना त्यांच्या पायावर उभे करण्याची आहे. अशी गरजू वाटणारी माणसे आपल्याच जगात जन्माला आली आहेत, त्यामुळे त्यांच्याही वाट्याला मानवी प्रतिष्ठा आणि स्वाभिमानी जगणे आले पाहिजे, अशी एक समन्यायी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, यासाठी अविरत प्रयत्न करण्याची निश्‍चितच गरज आहे. ज्यांच्याकडे अधिक संपत्ती जमा झाली आहे, अशा श्रीमंतांनी धोरणात्मक बदल करण्यासाठी त्या संपत्तीचा वापर करणे, ही खरी समाजसेवा आहे आणि तोच खरा पुरुषार्थ आहे. प्रत्यक्षात जे होते आहे, ते नेमके त्याच्या उलटे आहे.
आपल्याला मिळालेले यश हे कसे एकमेवाद्वितीय आहे, हे सिद्ध करण्याची धडपड बहुतांश श्रीमंत करताना दिसतात. आपण यशस्वी झालो याचा अर्थ आपण समाजाला शहाणपणा सांगण्यास लायक झालो, असा त्यांचा समज होतो आणि त्यातून एका उर्मट श्रीमंताचा जन्म होतो. त्यांना गरजू आणि गरीब माणसांबद्दल सहानुभूती वाटते, म्हणून ते मदत करत असतात. मदत करतानाचा मोठेपणा त्यांना हवा असतो. त्यातून मिळणाऱ्या खोट्या प्रतिष्ठेचे ते भुकेले असतात. समाजात किरकोळ काम केल्यावर त्याला समाजसेवा म्हणणारी एक मोठी फौजच तयार झाली असून ती त्याच जातकुळीतील आहे.
भविष्यातील पुरोगामी समाजात जशी लाचारी नको आहे, तशीच मुजोरीही नको आहे. पण बहुतेक वेळा श्रीमंत माणसांत जी मुजोरी दिसते, त्याने समाज पुढे जात नाही. गरज आहे, अशा सरकारी व्यवस्थेसाठी प्रयत्न करणे, जी अशा मुजोरांच्या प्रभावाला जुमानणार नाही. गरज आहे, सरकार नावाची व्यवस्था आर्थिकदृष्ट्य्‌ा सक्षम करण्याची. समाजाला गरज आहे, सर्वांना समान संधी देणाऱ्या व्यवस्थेची. भेदभावमुक्‍त व्यवस्थेची. अशी व्यवस्था प्रत्यक्षात यावी, यासाठी कदाचित दीर्घकाळ लागेल, पण कामाची दिशा तरी तीच असली पाहिजे. कारण सरकार नावाची व्यवस्था अपरिहार्य असून ती माणसाने सार्वजनिक हितासाठी निर्माण केली आहे.
आज तीच कमकुवत झाल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अशा कमकुवत व्यवस्थेला ठिगळे लावणे, म्हणजे वरवरची समाजसेवा. जेफ बेझॉससारखे फोर्ब्जच्या यादीतील आघाडीचे श्रीमंत असोत नाहीतर वेळ जात नाही म्हणून समाजसेवा करणारे नागरिक असोत, त्यांनी धोरणात्मक निर्णयांच्या माध्यमातून होणाऱ्या शाश्‍वत बदलाचा आग्रह करण्याचे धाडस केले पाहिजे. पैशांचे करायचे काय, असा प्रश्‍न पडलेल्या जेफ बेझॉसपर्यंत हे एका नागरिकाचे मत कसे पोहोचवता येईल, हे माहीत नाही. पण आपल्या देशातील अतिश्रीमंतांना धोरणात्मक निर्णयाचे महत्त्व पटले तरी त्यांच्या मनातील समाजसेवेची व्याख्या बदलण्याची सुरुवात तरी होईल, अशी आशा वाटते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)