पुणे – बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे आणि रोना विल्सन प्रकरणातील विविध अर्ज आणि जामिनावरील सुनावणी 27 सप्टेंबर रोजी होणार आहे. विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून गडलिंग, ढवळे यांच्यासह पाच जणांना येरवडा कारागृहात ठेवणे सोयीस्कर नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्या कारागृहात हलविण्यात यावे, अशी मागणी न्यायालयात अर्जाद्वारे येरवडा कारागृह प्रशासनाने केली आहे. अॅड. गडलिंग आणि शोमा सेन यांनी न्यायालयात जामिनाकरिता अर्ज दाखल केला असून याबाबत पोलिसांची बाजू मांडण्या संदर्भात अर्ज सादर करण्यात आला आहे.

यावेळी युक्तिवाद करताना, अॅड. गडलिंग म्हणाले, जामिनाकरिता मी न्यायालयात अर्ज दाखल करून सुमारे एक महिन्याचा कालावधी होत आला असून त्यावर लवकर सुनावणी घेण्यात यावी. तसेच, कारागृहात पुस्तके वाचण्याकरिता मिळावी, अशी मागणी केली होती. त्या संदर्भात न्यायालयाने पुस्तके देण्यासंदर्भात देखील आदेश दिला असताना अद्याप मला पुस्तके मिळाली नसल्याचे अॅड. गडलिंग यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच, लवकरात लवकर आपल्याला पुस्तके मिळावी, अशी विनवणी केली. यावर न्यायालयाने अद्याप पुस्तके का मिळाली नाही. याबाबत स्वतंत्र चौकशी करण्यात येईल असे सांगत, नवीन पुस्तकांची काही यादी असेल तर सादर करा, यापुढे न्यायालयामार्फत पुस्तके पोलिसांकडून तपासणी करून देण्यात येतील, असे सांगितले आहे. जामिनावरील युक्तीवादाच्या अगोदर गडलिंग यांना पुस्तक द्या, असेही न्यायालयाने पोलिसांना सांगितले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार काम पाहात आहेत. तर, बचाव पक्षाच्या वतीने अॅड. रोहन नहार, अॅड. शाहिद अख्तर काम पाहात आहेत.

गडलिंग याला घ्यायची आहे “सायबर लॉ’ची पदवी
अॅड. सुरेंद्र गडलिंग याने न्यायालयात अर्ज सादर करून आपणास कारागृहात इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ अंतर्गत “डिप्लोमा इन सायबर लॉ’चे शिक्षण पूर्ण करायचे आहे. त्याकरिता परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

गणेशोत्सवाचा युक्तीवादाशी काय संबंध?
सरकारी वकीलांनी सध्या गणपती उत्सव सुरू असून गणपती विसर्जनानंतरच 27 सप्टेंबर रोजी जामीन अर्जावरील सुनावणी ठेवण्यात यावी, अशी मागणी न्यायालयात केली. त्यावर अॅड. गडलिंग यांनी आक्षेप घेताना गणपती उत्सव आणि जामिनाचा काय संबंध असा प्रश्‍न उपस्थित करताना सुनावणी 21 सप्टेंबर रोजी ठेवण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने सर्वांच्या अर्जावर एकाचवेळी सुनावणी होण्याच्या दृष्टीने 27 सप्टेंबर ही योग्य तारीख असल्याचे नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)