अरे खोप्यामधी खोपा…

लाखणगाव- निसर्गाचे रहाटगाडगे त्याच्या नियमानुसार अव्याहतपणे सुरू असते. त्याचे संकेत पशु-पक्षांनाही बरोबर कळतात. म्हणूनच पावसाची चाहुल लागली की सुगरण पक्षी त्याचे घरटे बांधायला सुरुवात करतो. मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यातच खोप्यासाठी गवत गोळा करण्याची घाई या पक्षांना लागलेली असते.
पोरासोरांना या सुबक, सुंदर घरट्याचे मोठेच आकर्षण असते तर, कलावंतांनी हे घरटे थेट कथा-कवितांमध्येच नेऊन ठेवते. या काळात रानावनात नजर फिरवली की या घरट्यांची अर्थात खोप्यांची बांधणी सुरू असल्याचे दृष्टीस पडते. पिल्लांच्या संरक्षणाची संपूर्ण सोय व्हावी, त्यांचे वारा- पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी सुगरणी खोपा बनवण्यात मग्न आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आकाशात ढग गोळा होऊ लागले की विहिरीत उगवलेली पिपळाची झाडे, रानावनातील काटेरी झुडपे किंवा मोठ्या वृक्षांवरही सुगरणींनी चालवलेली घरट्यांची तयारी दृष्टीस पडते.
विहिरी, बंधाऱ्याच्या कडेला असणाऱ्या झाडांवर या सुगरणींचे घरटे हमखास पाहायला मिळते. नियोजन नाही की आराखडा नाही. सिंमेट नाही की माती नाही, तरीदेखील “सुगरण’ नावाच्या परंपरेला जोपासत बांधलेले घरटे म्हणजे विणकामाचा एक उत्तम नमुनाच ठरावा. रानावनात, नदीच्या कडेला काटेरी झाडांवर सुगरण छोटेसे घरटे बांधते. खमंग, चवदार स्वयंपाक करणाऱ्या महिलेला सहजपणे सुगरणीची उपमा दिली जाते. या सुगरण पक्षाचे वैशिष्ट्य मात्र खोप्याच्या बांधणीत शोभून दिसते. एखाद्या कुशल विणकऱ्यालाही लाजवेल असे सुरेख व सुंदर घरटे सुगरण तयार करते. साधारणत: पावसाळ्याची चाहूल लागल्यावर सुगरण पक्षी गवताचे बारीक तंतू व ज्वारीच्या पानांवरील बारीक शिरांपासून घरटे बांधण्यास सुरुवात करते. सुरक्षितता म्हणून शत्रू पोहोचणार नाही, अशा काटेरी झाडांवर ही घरटी साकारलेली असतात. तसेच, विहिरींजवळील असणाऱ्या झाडांवर ही घरटी मोठ्याप्रमाणात दिसण्यास सुरुवात झाली आहे.

  • … मग पुन्हा खुणावतात
    पावसाळ्याच्या काळात या घरट्यात पिलांचे संगोपन होते. पुढे पिलांना पंख फुटले की ही घरटी रिकामी होतात. मग मुलेच काय तर थोरामोठ्यांनाही रिकामी झालेली घरटी घरी आणण्याचा मोह आवरत नाही. ग्रामीण भागात काही घरट्यांना दिवाणखान्यातही जागा मिळते. काही काळानंतर मुलांच्या हाताळण्यामुळे ही घरटी विस्कटून जातात. मग पुढच्या पावसाळ्यात पुन्हा ही घरटी लहानथोरांना खुणावू लागतात.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)