अरुण जगताप यांनाच लोकसभेची उमेदवारी

मुंबईच्या बैठकीत शिक्कामोर्तब; ऍड. ढाकणे यांनीही व्यक्त केली इच्छा
प्रभात वृत्तसेवा
नगर – नगर लोकसभा मतदारसंघातून आमदार अरुण जगताप यांना उमेदवारी देण्यावर मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. असे असले, तरी ऍड. प्रताप ढाकणे यांनीही आपण या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. जगताप यांनी स्वतः मात्र निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मुंबईत लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा घेत आहे. नगरची बैठक रविवारी सकाळी झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, नगरचे प्रभारी दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आमदार अरुण जगताप, राहुल जगताप, वैभव पिचड, माजी आमदार पांडुरंग अभंग, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू, माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, रावसाहेब म्हस्के, प्राजक्त तनपुरे, मधुकर उचाळे, प्रशांत गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
लोकसभेच्या नगर लोकसभा मतदारसंघाबाबत अनेक प्रवाद ऐकायला येतात, असे एकाने निदर्शनास आणताच शरद पवार यांनीच नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला आहे, असे स्पष्ट केले. हा मतदारसंघ कुणालाही दिलेला नाही. इथून राष्ट्रवादीच निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे नगरमधील अन्य मतदारसंघाचा आढावा न घेता फक्त नगर लोकसभा मतदारसंघाचाच आढावा घेतला जाईल, असे स्पष्ट केले. या वेळी प्रत्येक तालुकानिहाय राजकीय स्थिती, पक्षाला मिळू शकणारी संभाव्य मते याचा आढावा घेण्यात आला. कार्यकर्त्यांना नेत्यांनी बोलते केले. तनपुरे यांनी उमेदवारीबाबत पक्षाने निर्णय घ्यावा, उमेदवार कुणीही दिला, तरी त्याला तालुक्‍यातून आघाडी देण्याचे काम आम्ही करू, अशी ग्वाही दिली. त्यानंतर या मतदारसंघातून इच्छुकांबाबत विचारणा करण्यात आली. त्यात बहुसंख्य उपस्थितांनी अरुण जगताप यांचे नाव सुचविले. जगताप पिता-पुत्रांनी मात्र त्यावर काहीच भाष्य केले नाही. ऍड. ढाकणे यांनी जगताप हे आपले मित्र आहेत; मात्र आपण स्वतःही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
नगर लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी राहुरी, कर्जत-जामखेड व पाथर्डीत भाजपचे आमदार आहेत. नगर शहर व श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर पारनेरला शिवसेनेचे आमदार आहेत. नगर महानगरपालिकेतही राष्ट्रवादी अडीच वर्षांपूर्वीपर्यंत सत्तेत होती. अरुण जगताप यांची उमेदवारी देण्यामागे त्यांचे कॉंग्रेसच्या नेत्यांशी असलेले संबंध आणि इतर पक्षीय नेत्यांतील त्यांचे नातेवाईक, त्यांची राष्ट्रवादीला मिळणारी अंतस्थ मदत तसेच वर्षानुवर्षे नगरमध्ये राहत असल्याने इथल्या व्यापाऱ्यांशी तसेच अन्य घटकांशी असलेल्या संबंधाचा विचार पक्षाने केला असावा. अर्थात हा निर्णय असून ऐनवेळी दोन्ही पक्षांतील जागावाटप, सत्तेची समीकरणे जुळवताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी पाहता उमेदवारीबाबत काहीही होऊ शकते. यापूर्वी राष्ट्रवादीने अगोदर उमेदवार जाहीर करून नंतर त्यात बदल केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)