अरविंद पनवरने पटकावला “घाटाचा राजा’ किताब

सातारकरांनी अनुभवला राष्ट्रीय साहसी सायकल स्पर्धेचा थरार
सातारा – अरविंद पनवर याने “घाटाचा राजा’ हा किताब पटकावताना सातारा येथे पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय साहसी सायकल स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. जावळी मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऍमॅच्युअर सायकलिंग असोशिएशन ऑफ सातारा आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या साहसी सायकल स्पर्धेचा थरार सातारकरांनी अनुभवला.

स्पर्धेसाठी सातारा ते मेढा, महाबळेश्वर आणि महाबळेश्वरहून पाचगणी, वाई मार्गे पुन्हा सातारा असे तीन मार्ग होते. सातारा ते मेढा या मार्गावरील स्पर्धेत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले आणि रुदनीलराजे भोसले सहभागी झाल्याने स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. महाराष्ट्र राज्य सायकलिंग संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश कदम यांच्या नियोजनातून सोमवारीच राष्ट्रीय साहसी सायकल स्पर्धेची तयारी पूर्ण झाली होती. सकाळी 6 वाजता साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकुल येथून स्पर्धेस आमदार श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योजक अजित मुथा व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. स्पर्धेत देशाच्या विविध भागांतील सुमारे 300 सायकलस्वार सहभागी झाले होते.

सातारापासून महाबळेश्वर, पाचगणीमार्गे वाई शहरातून पुन्हा सातारा असा अवघड ट्रॅक सायकलपटूंना पार करावयाचा होता. परंतु नैसर्गिक वातावरण आणि स्थानिकांचा उत्साह आणि पाठिंब्यामुळे अनेक सायकलपटूंना तो सुसह्य झाला. स्पर्धा मार्गालगतच्या प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवला. स्पर्धेचा समारोप कुपर कॉलनी कदम बाग, येथे झाला. तसेच हौशी स्पर्धकांसाठी सातारा ते मेढा मार्गावर सायकलिंग स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात सातारकर मोठया संख्येने सहभागी झाले होते.

या शर्यतीत अद्वैत दीक्षित (पुणे), धैर्यशील पाटील (सातारा), डॉ. प्रतीक भोईटे (रा. फलटण) यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. सातारा ते महाबळेश्वर या मार्गासाठी अरविंद पनवर, मनोहर लाल, अनिल मंगलो यांनी, तर सातारा ते महाबळेश्वर आणि वाई मार्गे पुन्हा सातारा या मार्गावर दिनेश कुंभार, बजरंग डेलू, गणेश पवार यांनी क्रमांक पटकावले. घाटाचा राजा हा किताब अरविंद पनवर यांनी पटकावला. विजेत्यांना एकूण 6 लाख 66 हजारांची बक्षिसे देण्यात आली. सातारा मेढा सातारा पहिल्या तीन क्रमांकांना चषक देण्यात आले व स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला पदक देण्यात आले. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांमधून लकी ड्रॉ काढून 3 रेसर सायकल भेट देण्यात आल्या.

या स्पर्धेसाठी जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे सहकार्य लाभले. पारितोषिकांचे वितरण आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आशियाई सायकलिंग फेडरेशनचे सचिव ओंकार सिंग, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव व्ही.एन. सिंग, राष्ट्रीय सायकलिंग संघटनेचे सहसचिव गजेन गानला, सचिव प्रताप जाधव, आजीव सदस्य विजय जाधव, तसेच संघटनेचे सर्व सदस्य आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या स्पर्धेत एक गरीब सायकलपटू साधी सायकल घेऊन सहभागी झाला होता. त्याने 110 कि.मीची स्पर्था योग्य वेळेत पूर्ण केल्याबद्दल त्याला 40 हजार रु.किमतीची रेसर सायकल क्‍वालिटी ग्रुपच्या वतीने भेट देण्यात आली. तर साताऱ्यातील सायकलपटू विनीत कुलकर्णी यांनी साध्या सायकलवरून 55 कि.मी.ची सातारा-मेढा-सातारा ही स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धा यशस्वी करण्यात पोलिसांचा सिंहाचा वाटा
साताऱ्यातील ही राष्ट्रीय साहसी स्पर्धा यशस्वी करण्यात पोलीस अधीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असून त्यामुळेच स्पर्धा उत्कृष्टरीत्या पार पडली असे महाराष्ट्र सायकलिंग संघटनेचे उपाध्यक्ष अविनाश कदम यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)