अरविंद केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकली 

हल्ल्यामागे भाजप असल्याचा “आप’चा आरोप 

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज एका व्यक्‍तीने मिरची पूड फेकली. दिल्ली सचिवालयाच्यातील केजरीवाल यांच्या कार्यालयाबाहेरच हा हल्ला करण्यात आला. केजरीवाल यांच्यावरील हा हल्ला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे.

-Ads-

केजरीवाल यांच्यावर मिरची पूड फेकणाऱ्या व्यक्‍तीचे नाव अनिल कुमार असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्यादरम्यान केजरीवाल यांचा चष्मा फुटला मात्र त्यांच्या डोळ्यांना कोणतीही इजा झाली नाही, असे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सचिवालयातील तिसऱ्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या चेंबर बाहेर हा हल्ला झाला. केजरीवाल जेवणासाठी बाहेर जात असताना अनिल कुमारने त्यांच्या डोळ्यांवर मिरची पूड फेकली. हा हल्ला करणाऱ्या अनिल कुमारकडून त्याचे आधार कार्ड मिळाले आहे. तंबाखूच्या बटव्यातून त्याने ही मिरचीपूड आणलेली होती. मिरची पूड फेकल्याबद्दलच्या शिक्षेनंतर तुरुंगातून बाहेर आल्यावर केजरीवाल यांना गोळी मारण्याचीही अनिल कुमार याने धमकी दिली.

या हल्ल्याबद्दल “आप’ने भाजपला जबाबदार धरले आहे. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हल्ल्याची उच्चस्तरिय चौकशीची मागणी केली आहे. केजरीवाल यांच्यावर महिन्याभरात तिसऱ्यांदा असा हल्ला झाला आहे. सिग्नेचर पूलाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्यांच्यावर पाण्याच्या बाटल्या भिरकावण्यात आल्या होत्या. तर दसऱ्याच्या सुमारास एक अज्ञात व्यक्‍ती केजरीवाल यांच्या घरात घुसला होता आणि त्याने केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांकडून पुरेशी सुरक्षा पुरवली जात नसल्याचा आरोप केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांनी केला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)