अरविंद केजरीवाल की अजीब दास्तान…

    सोक्षमोक्ष

    हेमंत देसाई

सुरुवातीला बेफाम आरोप करून, लोकप्रियता मिळवण्यात केजरीवाल यांनी धन्यता मानली. सरकार चालवताना सर्वांचे सहकार्य घ्यावे लागते. शिवाय गेल्या काही वर्षांतील सरकारमधील अनुभवातून अरविंदजींना प्रगल्भता व जबाबदारीचे भान आले असावे, असे आपण मानूया. पण माफी मागण्याची प्रक्रिया ही लोकशाही असायला हवी होती. पण त्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकले. भविष्यात केजरीवाल व त्यांचा पक्ष अधिक जबाबदारीने वागेल, अशी अपेक्षा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या व्यक्‍तीस नेहमीस जबाबदारीने वागावे लागते. आम आदमी पक्षाने राजकारणात काही बाबतीत गुणात्मक परिवर्तन आणले, हे खरे आहे. ज्याच्याकडे पैसे नाहीत, पण जो प्रामाणिक आहे, अशा व्यक्‍तींना तिकिटे दिली. कुठलाही इतिहास नसताना, जवळ पैसा नसताना कॉंग्रेस व भाजपसारख्या दिग्गज पक्षांना लोळवून दिल्लीत सत्ता आणली. गरिबांना स्वस्तात वीज, पाणी, घरे आणि शिक्षण या सोयी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम आदमी पक्षाच्या सरकारने चालवला आहे; परंतु त्याचवेळी पक्षाच्या काही मंत्री व आमदारांवरती गंभीर आरोप होऊन, त्यांची हकालपट्टीही करावी लागली आहे. शिवाय आरोपबाजीत या पक्षाला विशेष रस आहे.

“संसदेतील बहुसंख्य लोक चोर, गुन्हेगार आहेत’, असा आरोपही आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. आता यापूर्वी केलेल्या बेछूट आरोपांमधून सुटका करून घेण्यासाठी, केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांची माफी मागितली आहे. गडकरी भाजपचे अध्यक्ष असताना, त्यांच्या “पूर्ती उद्योग’ समूहावरून अरविंदजींनी त्यांना लक्ष्य केले होते. गडकरींनी त्यांच्याविरुद्ध बदनामीचा खटलाही दाखल केला होता. पुढे गडकरी व केजरीवाल यांच्यात स्नेह निर्माण झाला. तेव्हा त्यांनी गडकरींची माफी मागितली आणि गडकरींनी तो खटला मागे घेतला. सिब्बल यांच्याशीही केजरीवाल यांनी समझोता केला आहे.

“पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंग माजिथिया हे ड्रग्जचा व्यापार करत होते’, असा आरोपही केजरीवालांनी केला होता. या आरोपात तथ्य न आढळल्याने, आपण हा आरोप मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर करून टाकले. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या पंजाब शाखेत भूकंपच झाला. वास्तविक पंजाबमधील अकाली दलाच्या नेत्यांचे ड्रग्ज धंद्याशी संबंध असल्याचा आरोप करूनच आम आदमी पक्ष तिथे रुजला आणि त्याचे काही आमदारही निवडून आले.

खरे तर, माजिथिया हे ड्रग्ज माफिया असल्याचे सरकारी यंत्रणांना आढळले आहे. कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनीच एका टीव्हीवरील मुलाखतीत ही माहिती दिली. तरीही, आरोपात तथ्य नसल्याचे अरविंदजी म्हणतात. इतक्‍या गंभीर चुका केजरीवाल वारंवार कशा करतात? आता आपचे आमदार कुठल्या तोंडाने लोकांकडे मते मागण्यासाठी जाऊ शकतील? माफी मागण्यापूर्वी अरविंदजींनी आपच्या पंजाब शाखेला या गोष्टीचा पत्ताही लागू दिला नाही. याला पक्षांतर्गत लोकशाही म्हणता येऊ शकेल का?

दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर उमेदवार पाठवताना, मीरा संन्याल, आशिष खेतान, आशुतोष, कुमार विश्‍वास अशांना डावलून अरविंदजींनी पैसेवाल्यांनाच तिकिटे दिली. पैशाच्या बळावर निवडणुका जिंकणे हे प्रस्थापित पक्ष करतात. मग आम आदमीचे वेगळेपण काय? पक्षनिष्ठा, प्रमाणिकता आणि निर्भयता ही या पक्षाची वैशिष्ट्य्‌े होती. आम आदमीकडे असे असंख्य तळमळीचे कार्यकर्ते आहेत. परंतु धनिकांनाच प्राधान्य देणारा हा पक्ष आहे का, असे या कार्यकर्त्यांनाही वाटू लागले असेल. कोर्टबाजीची कटकट नको, म्हणून केजरीवालांनी गुपचूप माघार घेतली. पण मग त्यांनी 20 भ्रष्ट राजकारण्यांची यादी कशाला प्रसिद्ध केली, असा रोखठोक सवाल आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी केला आहे. केजरीवाल हे एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबाबत वारंवार माफीनाम्याची वेळ येणे, हेच शोचनीय आहे.

दिल्ली आणि पंजाबनंतर आपची महाराष्ट्रातली टीम ही सगळ्यात चांगली होती. परंतु योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रा. आनंद कुमार व अदित झा यांना पक्षातून हाकलण्यात आले, तेव्हा त्यामागचे कटकारस्थान व ढोंगबाजी आपचे महाराष्ट्रातील प्रमुख मयांक गांधी यांनी उघड केली. त्याबरोबर महाराष्ट्रातील आपच्या सर्व समित्या बरखास्त करण्याचा आदेश केजरीवालांनी जारी केला. सुभाष लोमटे, सुभाष वारे यांच्यासारखे अनेक समर्पित कार्यकर्ते व नेते आपला लाभले होते. परंतु त्यांचाही भ्रमनिरास झाला. मेधा पाटकरांनाही पक्षाशी जुळवून घेता आले असते. परंतु तेही घडले नाही. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचारविरोधी अभियान महाराष्ट्रापासून सुरू झाले व दिल्लीपर्यंत पोहोचले. मात्र महाराष्ट्रापासून प्रेरणा घेऊन, क्‍केजरीवाल यांनी महाराष्ट्राचाच विश्‍वासाचा घात केला.

एवढे होऊन देखील, आजही धनंजय शिंदेंसारखे हुशार व कष्टाळू कार्यकर्ते महाराष्ट्र व गोव्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी झिजत आहेत. मुख्य सचिवांना मारहाण करण्याचा प्रकार तर कमालीचा धक्‍कादायक होता. सन 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आपच्या स्वयंसेवकांनी पक्षाची एक प्रभावी लाट निर्माण केली होती. परंतु तिकिटे देतानाही धनिक-वणिकांना झुकते माप मिळाले आणि काही संशयास्पद चारित्र्याच्या व्यक्‍तींनाही तिकिटे देण्यात आली. संशयित गुन्हेगारांना तिकिटे दिल्यामुळे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव संतापणे साहजिकच होते. त्यानंतर दोघा जणांची तिकिटे नाइलाजाने कापण्यात आली.

मागे 49 दिवसांच्या सत्तेनंतर अरविंदजींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, त्यावेळी पक्षाची कार्यकारिणी व राजकीय व्यवहार समितीशी चर्चादेखील केली नव्हती. वाराणसीमध्ये व इतरत्र लोकसभा निवडणुका लढवताना पक्षाचा दारुण पराभव होईल, हे सांगूनही केजरीवालांनी ऐकले नव्हते. उलट नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची भाषा केली जात होती. एका टप्प्यावरती कॉंग्रेसची मदत घेण्याचाही प्रयत्न त्यांनी पडद्याआडून केला होता. थोडक्‍यात, आपचा व्यवहारही स्वच्छ व पारदर्शी आहे, असे नव्हे. मुख्यतः पक्षात निर्णय लोकशाही पद्धतीने घेतले जातात, असेही दिसत नाही.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)