अरविंदजी, सर्वात आधी अण्णांची माफी मागा

  दिल्ली वार्ता

  वंदना बर्वे

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही जणांची माफी मागितली आहे. वारंवार माफी मागावी लागली तर याचे सर्वाधिक नुकसान माफी मागणाऱ्यालाच होते, याची जाणीव त्यांना होवू लागली असावी. आपला मुख्यमंत्री कुणावरही खोटे आरोप करतो आणि नंतर माफी मागतो हे दिल्लीवासीयांना अजिबात आवडणार नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाजप आणि कॉंग्रेसच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपांची तोफ डागणारे आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अचानक सगळ्यांची माफी मागू लागले आहेत. त्यांचं एवढं मोठं हृदय परिवर्तन होण्याचं नेमकं कारण काय, याचं अचूक उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही. मात्र, संकटाचा काळ माणसाला बरंच काही शिकवून जातो असं म्हणतात. राजकारणात उठसूट कुणावरही आरोप करणं किती धोकादायक असतं, हे केजरीवाल यांना काळानंच शिकवलं असावं!

केजरीवाल यांना सध्या घोर पश्‍चाताप झाला आहे. म्हणून त्यांनी पक्षीय भेदाभेद न करता कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांना क्षमा मागितली आहे. केजरीवाल यांनी राष्ट्रीय महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, माजी दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल, पंजाबचे नेते मजिठीया यांची नुकतीच लेखी माफी मागितली. भविष्यात आणखी काही मंत्र्यांची माफी मागण्याची शक्‍यता आहे. यात प्रामुख्याने कुणाचा उल्लेख करायचा झाला, तर अर्थमंत्री अरूण जेटली यांचा करता येईल.

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेते अण्णा हजारे यांचे सन 2011 मधील आंदोलन अभूतपूर्व यशस्वी झाले होते. याचा खरा फायदा झाला तो केजरीवाल यांना. अण्णांच्या आंदोलनामुळे ते हिरो झाले आणि या प्रसिध्दीचा त्यांनी अचूक वापर केला तो राजकारणात स्थिरावण्यासाठी. त्यासाठी त्यांनी पहिलं शस्त्र वापरलं ते भाजप आणि कॉंग्रेसमधील बड्या नेत्यांना टार्गेट करण्याचं. सध्याच्या राजकारणातील सर्व पक्ष आणि त्यांची सर्व नेते भ्रष्टाचारी आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी करायला सुरूवात केली.

कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातील भ्रष्टाचारांच्या श्रृंखलेमुळे जनतेनेही केजरीवाल यांच्या आरोपावर विश्वास ठेवला. केजरीवाल यांनी निवडूक लोकप्रिय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. “पूर्ती साखर’  कारखान्याच्या माध्यमातून भाजपचे माजी अध्यक्ष गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. जेटली, रिलायंस समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि संपुआ सरकारमधील मंत्र्यावरही आरोप केले. यामुळे गडकरी यांच्यासह विविध नेत्यांनी केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. हा खटला मागे घ्यावा अशी विनंती केजरीवाल यांनी नुकतीच लेखी स्वरूपात केली. महत्वाचे म्हणजे, गडकरी यांनी लगेच क्षमासुध्दा केली. कारण ते सूडाचे राजकारण कधीच करीत नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही. मुद्दा असा आहे की, पुरावे नव्हते तर मग आरोप केलेच का? आणि पुरावे असतील तर माफी मागण्याचे कारण काय?

खरं म्हणजे, माफी मागतल्याने कुणी लहान होत नाही. उलट तो मोठ्या मनाचा माणूस म्हणूनच गणला जातो. मात्र, ही बाब केजरीवाल यांच्यावर लागू होत नाही. कारण, ज्या चुका त्यांच्या हातून झाल्यात, त्या जाणीवपूर्वक आणि राजकीय लाभ मिळविण्यासाठी केल्या गेल्या होत्या. केजरीवाल यांनी अजून जेटली यांची क्षमा मागितलेली नाही. आणि माफी मागितली तरी जेटली क्षमा करणार काय, हा प्रश्न उरतोच.

केजरीवाल यांना आपल्या चुकांचा खरंच पश्‍चाताप होत असेल तर त्यांनी सर्वात आधी अण्णांची माफी मागायला पाहिजे. यानंतरही, अशी अनेक माणसे आहेत जी अण्णांच्या आंदोलनासह केजरीवाल यांच्या पाठिशी होती. केजरीवाल यांनी एक-एक करून सर्वांना बाजूला केले. यात प्रशांत भूषण, शांती भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास आणि पॉंडेचेरीच्या राज्यपाल किरण बेदी यांचीही माफी मागायला हवी. केजरीवाल यांनी या सर्वांचा अवमान केला आणि मन दुःखावले आहे. दुसरीकडे, केजरीवाल यांनी माफी मागितल्यामुळे आम आदमी पक्षात भूकंप आला आहे. पंजाबमध्ये आप तुटण्याच्या मार्गावर आहे. सध्या पंजाबमध्ये पक्ष वाचला. परंतु, पुरावे नव्हते तर आरोप करण्याची गरजच काय होती, अशी चर्चा आपच्या आमदारांमध्ये सुरू आहे.

राजकारणात अतिशय वेगाने यश मिळविणारे केजरीवाल यांनी यासाठी जो मार्ग निवडला होता त्याचा परिणाम हाच होणार होता. दिल्लीतील जनता आता केजरीवाल यांनाच प्रश्न करू लागली आहे. सन 2014 मध्ये रोहतकच्या एका सभेत बोलताना केजरीवाल यांनी मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांचे स्वीस बॅंकेत खाते असल्याचा आरोप केला होता. एवढेच नव्हे तर, त्यांनी या दोघांचे अकाउंट नंबर सुध्दा जाहीर केले होते. केजरीवाल यांच्या माफीनाम्यावर कुमार विश्वास यांनी खोचक आणि गलिच्छ भाषेत ट्‌वीट केले आहे.

अण्णा हजारे यांनीसुध्दा केजरीवाल यांना आरसा दाखविला. कुणी असे कोणतेही काम करू नये, ज्यासाठी त्यांना माफी मागावी लागेल. किती मोठे आश्‍चर्य आहे की, अण्णांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले केजरीवाल यांना त्याच रामलीला मैदानावर सुरू असलेल्या अण्णांच्या आंदोलनात आता पाय ठेवण्याची परवानगी नाही. आम आदमी पक्षाचे नेते केजरीवाल यांच्या माफीनाम्यावर कितीही सफाई देत असले तरी माफीनाम्यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा मलिन झाली हे खरे आहे. गडकरी आणि सिब्बल यांनी त्यांना माफ केले. परंतु, दिल्लीची जनता क्षमा करेल काय, हा खरा प्रश्न आहे. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले होते. यामुळे चिडलेल्या आयोगाने त्यांना धडा शिकविण्याची तयारी सुरू केली होती. आयोगाची निष्पक्षता आणि ईव्हीएमप्रती संशय निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी आयोगाने केंद्राला पत्रही लिहिले होते.

ईव्हीएम आणि आयोगाच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांच्या अडचणी आता वाढण्याची चिन्हे आहेत. उलटसुलट विधाने करून ईव्हीएमप्रती लोकांच्या मनात संभ्रमाची स्थिती प्रयत्न करणाऱ्या नेत्यांवर आयोग दंडात्मक कारवाई करणार आहे. अशा नेत्यांविरूध्द मानहानीचा खटला चालविण्याचा अधिकार देण्याची मागणी करणारे पत्र आयोगाने कायदा मंत्रालयाला लिहिले आहे. सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करीत आहे.

आयोगाने ईव्हीएम मशिन हॅक करून दाखविण्याचे आव्हान राजकीय पक्षांना दिले होते. मात्र, मिडीयासमोर ईव्हीएमवर संशय घेणारी मंडळी मशिन हॅक करू शकले नाहीत. आता आयोग अशा नेत्यांना धडा शिकवणार आहे. केजरीवाल आजही आयोगाच्या रडारवर आहेतच. याव्यतिरिक्त आणखी काही नेत्यांची नावेसुध्दा आयोगाच्या यादीत आहेत. मानहानीच्या प्रकरणात कारवाई करण्याचा अधिकार मिळाला तर आयोग कुणालाही अटक करू शकेल. निवडणूक आयोग केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणून काम करीत असल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. यामुळे संतापलेल्या आयोगाने हे पाऊल उचलले आहे. संविधानिक संस्थांचा अवमान करणे गुन्हा समजला जातो, असे निवडणूक आयोगाने त्या पत्रात नमूद केले आहे.

न्यायालय मानहानी कायदा 1971 अंतर्गत न्यायालय कुणावरही कारवाई करण्याचे किंवा अटक करण्याचे आदेश देतात. हा कायदा संसदेत पारीत होत होता तेव्हा निवडणूक आयोगासह काही संविधानिक संस्थांनासुध्दा अशाप्रकारचे अधिकार देण्याची मागणी केली गेली होती. मात्र, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारला त्यावेळी हे योग्य वाटले नाही. आयोगाने आता पुन्हा हे प्रकरण उकरून काढले आहे. त्याचा सर्वाधिक फटका केजरीवालांसारख्या नेत्यांना बसू शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)