अयोध्येत बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ उभारा

रामदास आठवले यांची मागणी : राम मंदिराला आमचा पाठिंबा

पुणे – अयोध्येत राम मंदिर आणि मस्जिदबरोबरच बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ उभारण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी येथे केली. उत्खननामध्ये याठिकाणी बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर राम मंदिराला पाठिंबा आहे. मात्र, ते बेकायदा उभारण्यात येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-Ads-

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला भेट देऊन राम मंदिर उभारण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्‍वभूमीवर आठवले यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली. ते म्हणाले, अयोध्येत बौद्ध धर्मियांचे प्रार्थनास्थळ बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टामध्ये दाखल असलेल्या याचिकेचा निकाल जानेवारी महिन्यामध्ये लागणार आहे. तोपर्यंत थोडे सबुरीने घ्यावे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराची मागणी केल्यामुळे शिवसेनेला याचा फायदा होणार का, याबाबत विचारणा केली असता आठवले म्हणाले, शिवसेनेला याचा फायदा होणार नाही. राम मंदिर उभारणीचा मूळ विषय भाजपचा आहे. ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या भावनेचा विचार करावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पाकिस्तानधार्जिन्या मुस्लिमांना विरोध होता. अन्य मुस्लिमांना त्यांचा पाठिंबा होता, असे त्यांनी नमूद केले.

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका म्हणजे लोकसभेची रंगीत तालीम नाही. लोकसभेमध्ये मतदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम बघून मतदान करणार आहेत. आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना ही भाजपबरोबर राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

एल्गार परिषदेमुळे भीमा-कोरेगावमध्ये दंगल घडली, या मताशी मी सहमत नाही. हा पूर्वनियोजित प्रकार होता. 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने योग्य ती दखल घ्यावी. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपूर येथे सभा घेणार असल्याचे सांगून ते म्हणाले, वंचित विकास आघाडीमुळे कोणताही परिणाम होणार नाही. त्यांच्यापेक्षाही मोठा मेळावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

भिडेंवर कारवाई करा
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव दंगल प्रकरणात संबंध आहे का, याचे पुरावे तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, भिडे यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आणि असंसदीय वक्तव्य केल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)