नवी दिल्ली – पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहारातील प्रमुख आरोपी नीरव मोदीच्या कंपनीबाबत अमेरिकेत सुरू असलेली दिवाळखोरी विषयक कारवाईमध्ये सरकारने हस्तक्षेप केला आहे. केंद्रीय कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी ही माहिती दिली. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोक्सी यांनी मिळून पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे 13 हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या पार्श्वभुमीवर या प्रकरणी एकापेक्षा जास्त तपास संस्थांकडून तपास सुरू आहे. अमेरिकेत नीरव मोदीच्या काही कंपन्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज केल्याचे या तपासादरम्यान लक्षात आले आहे. यामुळे पंजाब नॅशनल बॅंकेचे मोठे नुकसान संभवू शकते. असे चौधरी यांनी सांगितले.
भारतात आर्थिक गैरव्यवहार आणि कायद्याचे उल्लंघन करून केलेल्या कंपन्यांवर भारतातील कायद्यानुसार कारवाई केली जायला हवी. नीरव मोदीची कंपनी फायरस्टार डायमंड आणि अन्य कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये गैरव्यवहार केला आहे. त्याच कंपन्या अमेरिकेत दिवाळखोरीचा अर्ज करत आहे. हे भारतातील “पीएनबी’ च्या हितास मारक आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेत सरकारने हस्तक्षेप केला आहे, असे चौधरी म्हणाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा