अमेरिकेच्या पुर्वेकडील भागाला वादळाचा मोठा तडाखा

फ्लोरेन्स वादळाने घेतले चार जणांचे बळी


पाच राज्यांत आणिबाणीची स्थिती घोषित

विलिमंग्टन – अमेरिकेच्या पुर्व किनारपट्टीला तसेच त्याला जोडून असलेल्याल भूभागाला फ्लोरेन्स नावाच्या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला असून तेथे वादळ व पावसाशी संबंधीत दुर्घटनांमुळे किमान चार जणांचे बळी गेल्याचे वृत्त आहे. किनाऱ्या लगत राहणाऱ्या सुमारे दहा लाख लोकांना तेथून हलवण्यात आले असून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तेथील लक्षावधी लोकांना तेथून अन्यत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

उत्तर कॅरोलिना प्रांतातील न्य बर्न या 30 हजार लोकवस्तीच्या गावाला या वादळाचा आणि त्यानंतर आलेल्या तुफानी पावसाचा मोठा तडाखा बसला. एकेठिकाणी एका इमारतीवर झाड पडून त्यात एक महिला आणि तिचा लहान बालक मरण पावले. नॅशनल हरिकेन सेंटरने या वादळाची तीव्रता आता पुर्वी पेक्षा कमी झाल्याचे घोषित केले असले तरी धोका मात्र अजून टळलेला नाही असे म्हटले आहे. उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कुपर यांनी म्हटले आहे की अजूनही पुढील काही दिवस आपल्याला तुफानी पावसाचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या एक हजार वर्षात पडला नाहीं इतका पाऊस या काळात पडू शकतो असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की पुढील आठवडाभर सतत पावसाचा धोका असल्याने आपल्या भागातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यातून अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्‌भवणार आहे. या वादळामुळे सुमारे 6 लाख 80 हजार लोकवस्तीच्या भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

21 हजार लोकांना तात्पुरत्या मदत छावण्यात देण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पुढील आठवड्यात वादळग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. तथापी त्यांच्या भेटीमुळे वादगळग्रस्तांच्या मदत कार्यात कोणताहीं अडथळा येणार नाही याची खात्री झाल्यानंतरच ते या भागाचा दौरा करतील असे त्यांच्या सचिवालयातून सांगण्यात आले आहे. या वादळाच्या आपत्तीमुळे नॉर्थ कॅरोलिना, साऊथ कॅरोलिना, जॉर्जिया, मेरीलॅंड आणि व्हर्जिनीया या प्रांतात आणिबाणी घोषित करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)