अमेरिकेचे वरीष्ठ प्रतिनिधी भारताशी चर्चा करणार 

इराणहून भारतात तेल आयात सुरूच ठेवण्याचे प्रकरण 
वॉशिंग्टन: अमेरिकेने इराणवर येत्या 4 नोव्हेंबर पासून कडक आर्थिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्या दिवसापासून कोणत्याही देशाने इराणहून तेल आयात करू नये असा अमेरिकेचा आग्रह आहे. तथापि हे निर्बंध झुगारून इराणहून तेल आयात सुरूच ठेवण्याचा निर्णय भारताने घेतल्याने त्याविषयी भारताशी चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे एक वरीष्ठ प्रतिनिधी याच आठवड्यात भारतात येत आहेत.
इराणने आपला वादग्रस्त अण्वस्त्र निर्मीतीचा कार्यक्रम सुरूच ठेवल्याने त्यांच्यापासून जगाला विशेषत: त्यांच्या शेजारील देशांना मोठा धोका आहे. हा धोका नाहीसा करायचा असेल तर इराणला वठणीवर आणावे लागेल या हेतूने अमेरिकेने त्यांच्यावर हे निर्बंध लागू केले आहेत. त्याचा जगातल्या सर्वच संबंधीत देशांनी सन्मान करावा आणि हे निर्बंध लागू करावेत अशी अमेरिकेची अपेक्षा आहे. अमेरिकेचे इराण व्यवहार विषयक प्रतिनिधी ब्रायन हुक हे त्या संबंधात विविध देशांशी चर्चा करीत आहेत. पण भारताने मात्र ही तेल आयात 4 नोव्हेंबर नंतरही सुरूच राहील असे म्हटले आहे.
भारत सरकारच्या मालकीच्या दोन तेल कंपन्यांनी नोव्हेंबर साठीची तेल आयातीची ऑर्डरही इराणला दिली आहे अशी माहिती भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी दिली आहे. इराक आणि सौदी अरेबियानंतर भारत इराणहून मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो. भारताने 4 नोव्हेंबर नंतरही इराणहून तेल आयात सुरूच ठेवली तर भारतावरही अमेरिकेकडून कारवाई केली जाऊ शकते. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी हुक आणि अन्य अमेरिकन प्रतिनिधी भारताशी चर्चा करून भारताचे मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)