अमेरिकेचे एफ 16 लढाऊ विमाने आता भारतात तयार होणार

लॉकहिड मार्टिन कंपनीचा टाटा कंपनीसोबत करार

नवी दिल्ली, दि.19 – अमेरिकन हवाईदलाच्या ताफ्यातील लढाऊ विमान एफ-16 आता भारतात तयार होणार आहे. या विमानांची निर्मिती कंपनी असणाऱ्या लॉकहिड मार्टिन कंपनीने भारतातील टाटा कंपनीसोबत करार केला आहे. यामुळे भारताच्या संरक्षण उपकरणांच्या निर्मितीबाबतच्या क्षमता सिद्ध झाल्या आहेत. पॅरिसमधील एअर शो दरम्यान हा करार झाला आहे.

लॉकहिड मार्टिन कंपनीने भारताला एफ 16 विमान विकण्याची तयारी दर्शवली होती. या निर्णयाचे स्वागत करतानाच देशांतर्गत विमान बांधणी क्षेत्राला चालना मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विमानांची निर्मिती भारतात व्हावी अशी अट कंपनीसमोर ठेवली होती. पंतप्रधानांच्या या अटीला सकारात्मक प्रतिसाद देत लॉकहिडने भारतात विमानांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने टाटासोबत करार केला आहे. भारताच्या दृष्टीने हा करार अश्‍वासक असला तरी अमेरिकेच्या ट्रम्प सरकारच्या धोरणानुसार, भारतात प्रकल्प सुरु होणार असला तरी अमेरिकेतील रोजगारावर कपात येणार नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं येत्या काळात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्यापूर्वीच ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आल्याने भारतात आनंदाचे वातावरण आहे. भारताला शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर असून त्यानंतर रशिया आणि इस्त्रायल या देशांचा क्रमांक लागतो.
लॉकहिड मार्टिन कंपनीने आत्तापर्यंत 3,200 विमानांची निर्मिती केली असून जगातील 26 देशांमध्ये एफ 16 हे लढाऊ विमान वापरले जाते. एफ 16 विमानांच्या गटातील ब्लॉक 70 हे अत्याधुनीक विमान भारतात तयार केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)