अमेरिकी बॉन्ड यील्डमधील वाढ शेअर बाजाराची झेप रोखणार ?

मागील काही दिवसांपासून बाजारात सर्वत्र चर्चिलेल्या प्रमुख विषयांतील एक विषय आहे अमेरिकेच्या ट्रेझरी यील्ड (उत्त्पन्न) मधील वाढ. अमेरिकी ट्रेझरी म्हणजेच अमेरिकेचे सरकारी कर्जरोखे, ज्यांची मुदत 10 वर्षांपेक्षा जास्त व 30 वर्षांपेक्षा कमी असते व त्यांवर दरवर्षी ठराविक व्याज मिळत राहतं. हे व्याज वर्षातून दोनदा मिळते व मुदतपूर्तीस रोख्याची दर्शनी किंमत गुंतवणूकदारास परत मिळते. अमेरिकेत हा दर इतर व्याजदरांसाठी उदा. वाहनकर्ज दर, घरतारण (Home Mortgage) व्याजदर आणि इतर व्याजदर यांसाठी मापदंड (Benchmark) आहे. हा व्याजदर मागील आठवड्यात त्याच्या 4 वर्षांच्या उच्चांकावर (3%) पोहोचला व त्याच दिवशी म्हणजे 24 एप्रिल रोजी अमेरिकी बाजाराचा निर्देशांक डाऊ जोन्स (Dow Jones) हा तब्बल 500 अंशांनी कोसळला व त्याचे पडसाद जागतिक बाजारांबरोबर आपल्या बाजारात देखील उमटले.

आता पाहूयात बॉन्ड यील्ड (कर्ज रोख्यांवरील व्याज) व शेअर बाजार यांचा एकमेकांशी असलेला संबंध. काही अपवाद वगळले तर शेअर बाजार हा बॉन्ड मार्केटच्या विरोधात चालतो, म्हणजे बॉन्ड यील्ड कमी झाले तर शेअर बाजारास ते पूरक ठरतं व बॉन्डमार्केट यील्डमध्ये वाढ झाल्यास ते शेअर बाजारासाठी दीर्घ मुदतीत धोकादायक ठरू शकतं. हे संबंध जाणून घेण्यासाठी काही घटक आपण पाहूयात.

शेअरबाजारात गुंतवणूक संधीची किंमत – उदा. जर 10 वर्षांचे बॉन्ड यील्ड जर 7% असेल तर शेअर बाजारातील गुंतवणूक ही 7% पेक्षा अधिक परतावा देणारी असल्यास ती हितावह म्हणता येऊ शकते, परंतु शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच जोखमीच्या अधीन असल्यानं जर जोखीम अधिमूल्य (Risk Premium) हे 5% गृहीत धरल्यास एकूण परतावा हा 7% + 5% असा एकूण 12% किंवा त्याहून अधिक असल्यास त्यास गुंतवणुकीच्या संधीची किंमत म्हणता येईल. जर अशा परिस्थितीत शेअर बाजारातील परतावा 12% पेक्षा कमी आल्यास ते सयुंक्तिक म्हणता येणार नाही. कारण जोखमीसमोर परतावा देखील अधिक असणं कमप्राप्तच आहे व त्यानंतरच म्हणजे 12% हून अधिक परतावा वर्षोनुवर्षं मिळत राहिल्यास संपत्ती निर्मितीस हातभार लागू शकतो.

बॉन्ड यील्ड हे कंपनीच्या शेअरच्या कमाईशी (Earnings) संबंधित असतं. शेअरची कमाई म्हणजेच मागील 12 महिन्यांची सरासरी प्रति शेअर कमाई (EPS) / शेअरचा भाव द 100. उदा. रिलायन्सचा EPSरु. 96 गृहीत धरल्यास, 96 / 975 = 0.098, 100 = 9.8 %. जर हा परतावा बॉन्ड यील्ड पेक्षा जास्त असेल तरच या शेअरमध्ये गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे बॉन्ड यील्ड व भांडवली मूल्याचा फार महत्वाचा संबंध आहे. भांडवल मूल्याचा दर (Cost of Capital) ठरवण्यासाठीबॉन्ड यील्ड हे जोखीम रहित दर म्हणून विचारात घेतलं जातं. त्यामुळं जर बॉन्डचा दर वाढला तर भांडवली मूल्य देखील वाढतं. आणि भांडवली मूल्य जेवढं जास्त तेवढा त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर पडतो.

तसंच जर डेट मार्केटचा व्याजदर वाढला तर परकीय गुंतवणूकदार हे डेट मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त भर देतात व त्यासाठी शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतात. जे आपण मागील कांही महिन्यांत अनुभवत आहोत. फक्त एप्रिल महिन्यात (26 एप्रिलपर्यंत) परकीय गुंतवणूकदार संस्थांनी साधारण रु. 8475.88 कोटींची विक्री केलीय. तर 2017-18 या आर्थिक वर्षात हाच आकडा 78531.46 कोटी रुपये इतका आहे.
महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा बॉन्ड यील्डमध्ये वाढ होते तेव्हा कंपन्यांना हा एक इशारा असतो, घेतलेल्या कर्जावर वाढीव व्याज देण्याचा.

चढे व्याजदर हे कर्ज परतफेडीस मारक ठरू शकतात त्यामुळं नाजूक परिस्थितीतील कंपन्या कर्जबाजारी – दिवाळखोर ठरू शकतात आणि म्हणूनच शेअर बाजार हा चढ्या व्याजदराचा धसका घेतं. परंतु जर आपण या घटनांचा बारकाईने अभ्यास केलातर काही नकारार्थी बातम्या देखील थोड्या दिवसांत उत्तम परतावा देऊन जातात. जसे की घसरत असलेली रुपयाची किंमत (अमेरिकी डॉलरच्या तुलनेत) ही आपल्या अर्थव्यवस्थेसाठी जरी चिंतावह बाब असली तरी देखील निर्यातदार कंपन्यांसाठी विशेषतः टेक्‍नोलॉजी कंपन्यांसाठी तारक बाब ठरतीय. खालील तक्त्‌यात अशा कंपन्यांच्या शेअरचा 19 एप्रिलचा भाव व 26 एप्रिलचा भाव यांतील फरक दिलेला आहे.

अशाच प्रकारे सेंट गोबेन या शेअरनं 4 एप्रिल रोजी 60 रुपयास ट्रेंड ब्रेक आऊट दिल्यावर पुन्हा पताका सदृश रचनेस 72 रुपयावर ब्रेक आऊट दिले व तो शेअर त्याच दिवशी सुमारे 17.99 % उसळला तर या शेअरनं ट्रेंड ब्रेकआऊटच्या भावावर 41.48% परतावा फक्त 16 सत्रांत दिलाय. पुन्हा तेच सूत्र, शोधा म्हणजे सापडेल !..
मागील आठवड्यात निफ्टी50 ही ढोबळमानानं 10638 व 10560 यादरम्यान घुटमळत होती. 27 फेब्रुवारीचा उच्चांक (10631.65) व 23 एप्रिल रोजीचा उच्चांक (10638.35) हे जवळपास डबल टॉप संरचना दर्शवितात. आता पाहूयात निफ्टी या डबल टॉपच्या वर ब्रेक आऊट देतेय का पुन्हा खाली येतेय. डबल टॉपच्यावर ब्रेक आऊट दिल्यास तिचे उद्दिष्ट 11310 असण्यास हरकत नाही ! पाहूयात काय होतंय ते..


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)