सीरियन लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा
दमास्कस – अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस या तीन राष्ट्रांनी संयुक्तपणे सीरियावर मोठा क्षेपणास्त्र हल्ल केला आहे. सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांच्या सरकारने आपल्याच देशातील निदर्शकांवर रासायनिक हल्ल्यांचा वापर केल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगीतले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सीरियावर होणाऱ्या हल्ल्यांचे संकेत आधीच दिले होते. त्यामुळे कोणत्याही क्षणी हा हल्ला होईल असे स्पष्ट झाले होते. या तीन राष्ट्रांनी संयुक्तपणे एकूण शंभरावर अधिक क्षेपणास्त्र सीरियात डागली असे वृत्त रशियाने दिले असून त्यांनी अमेरिकेच्या या कृतीचा निषेध करताना त्याचे विपरीत परिणाम होतील असा इशारा दिला आहे.

सीरियातील बशर अल असद सरकारला रशियाचा पाठिंबा आहे. त्यांच्या समर्थनार्थ रशियाने सीरियात मोठे लष्करी तळ उभारले आहेत. पण हा हल्ला करताना रशियन लष्करी तळाला त्याची झळ पोहचू नये याची दखल अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी घेतली आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाट साडे चार वाजण्याच्या सुमाराला हा हल्ला झाला. सीरियाजवळील समुद्रात अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांच्या ज्या युद्ध नौका तैनात आहेत तेथून ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली तसेच विमानांतूनही हवाई हल्ले करण्यात आले आहेत.

राजधानी दमास्कस परिसरातही अनेक ठिकाणी हल्ले झाले असून त्यात नेमके काय नुकसान झाले याचा तपशील उपलब्ध व्हायचा आहे. रासायनिक प्रयोग शाळा आणि ही अस्त्रे ज्या शस्त्रागारात ठेवल्याचा संशय आहे ती सारी ठिकाणे या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आली असे सांगण्यात येत आहे. यातील काही क्षेपणास्त्रे सीरियाच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाडून टाकण्यातही यश मिळवल्याचे सांगण्यात येते.

आज रात्रीत करण्यात आलेल्या हल्ल्यांनंतर आम्ही आणखी हल्ल्यांची योजना अद्याप आखलेली नाही हा आमचा वन टाईम शॉट होता असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री जीम मॅटिस यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)