नागठाणे -ऊसातील मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळीच उपाययोजना केल्यास नियंत्रण करणे शक्य होत असल्याचे मत कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले. ते लष्करी अळी नियंत्रण शिवारफेरीच्या वेळी बोलत होते. नागठाणे (ता. सातारा) येथील संतोष लक्ष्मण साळुंखे यांच्या मका पिकावरील लष्करी अळी प्रादुर्भाव विषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, हा प्रादुर्भाव वेळीच उपाययोजना केल्यामुळे आर्थिक नुकसान पातळीच्या आत नियंत्रित झाला असून प्रत्येक शेतकऱ्यांनी याविषयी सतर्क राहून प्रतिबंधक उपाय योजना कराव्यात.
त्यानुसार ऊसात शक्यतो मका आंतरपीक घेऊ नये. सलग किंवा आंतरपीक मका असल्यास त्यामध्ये स्पोडो ल्युर व हेलीयोथीस ल्युरयुक्त एकरी 4 ते 6 काम गंध सापळे लावावेत; सायंकाळी 6 ते 8 यावेळेत एकरी 1 ते 2 प्रकाश सापळे लावावेत.
अझाडिरिक्टीन 1500 पीपीएम 5 मिलि/ली पाण्यातून फवारणी करावी. नांगरट, आंतरमशागत सकाळी किंवा सायंकाळी करावी म्हणजे अळी व कोष पक्षी वेचून खातात. अंडी पुंज व अळ्या वेचून नष्ट कराव्यात. नियंत्रनासाठी फोरेट किंवा 10% दाणेदार क्लोरोपायरीफौस एकरी 4 किलो मातीत मिसळून द्यावे तसेच थायोमिथाक्झाम + लम्डासायलोथ्रीन 3 मिलि प्रति 10 ली पाण्यातून फवारणी करावी. परंतु प्रभावी नियंत्रणासाठी लष्करी आळीची ओळख शेतकऱ्यांना होणे आवशक आहे. लष्करी अळीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग अशा 4 अवस्था मधून 30 ते 40 दिवसांत पूर्ण होतो.
यामधील लष्करीअळी अधाशीपणे वेडी वाकडी पाने खाते. कोवळा शेंडा खाऊन फस्त करते. पोंग्यात जावून पोंगा खाते. पानांवर ओल्या भूशा प्रमाणे विष्ठा सोडते. अळी काळपट रंगाची असून डोक्यावर उलट्या वाय आकाराचे चिन्ह असते. शरीरावर पट्टे असतात. मादी 100 ते 200 अंडी अर्ध गोलाकार पध्दतीने घालते. पतंग एका दिवसात 100 किमी प्रवास करतात त्यामुळे या अळीचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो. मका, ज्वारी, ऊस या पिकावर प्रादुर्भाव होतो त्यामुळे या पिकांवर वेळीच प्रतिबंधक उपाय योजना शेतकऱ्यांनी कराव्यात. असे आवाहन त्यांनी केले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा