इस्टेट एजंटची 90 हजाराची फसवणूक
पुणे,दि-3 अमेरिकन डॉलर देण्याच्या बहाण्याने एका इस्टेट एजंटला रुमालात कागदाचा बंडल गुंडाळून देण्यात आला. यासाठी त्याच्याकडून 90 हजाराची रोकड घेण्यात आली होती. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चार व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्तार खान(40,रा.थिटे वस्ती, खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांचा नंबर जस्ट डायलवरुन घेतला होता. त्यांच्याशी संपर्क साधून जमिन विक्री करायची असल्याचे सांगण्यात आले. यासाठी त्यांना हडपसर परिसरात बोलावून घेण्यात आले होते. जागेसंदर्भात चर्चा झाल्यावर त्यांना एक अमेरिकन डॉलर दाखवण्यात आला. याप्रकारचे आपल्याकडे 1210 डॉलर असल्याचे फिर्यादीला सांगण्यात आले. हे डॉलर स्वत:त विकत देतो असे सांगून त्यांच्याकडून 90 हजार रुपये रोख घेण्यात आले. यानंतर एका रुमालात डॉलर गुंडाळून देण्यात आले. फिर्यादीने आरोपी निघून गेल्यावर रुमाल उघडून बघितला असता, त्यामध्ये कागदाचा बंडल आढळला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)