#अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: ऐतिहासिक लढतीत नदालची थिएमवर मात

उपान्त्य लढतीत नदालसमोर युआन मार्टिन डेल पोट्रोचे आव्हान

न्यूयॉर्क: प्रदीर्घ काळ रंगलेल्या ऐतिहासिक उपान्त्यपूर्व लढतीत ऑस्ट्रियाच्या नवव्या मानांकित डॉमिनिक थिएमचे आव्हान मोडून काढताना गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारली. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून चार मिनिटांनी संपलेल्या आणि तब्बल 4 तास 49 मिनिटे रंगलेल्या या सामन्यात नदालने आपला घनिष्ट मित्र असलेल्या थिएमचा प्रखर प्रतिकार 0-6, 6-4, 7-5, 6-7 (4-7), 7-6 (7-5) असा संपुष्टात आणला.

अमेरिकन ओपनच्या उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्याची नदालची ही सातवी वेळ आहे. तसेच याआधी 2010, 2013 आणि 2017 अशा तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या नदालला चौथ्या विजेतेपदाची संधी आहे. त्यातच पाच वेळचा माजी विजेता रॉजर फेडररला चौथ्याच फेरीत जॉन मिलमनकडून धक्‍कादायक पराभव पत्करावा लागल्यामुळे नदालसमोरचा एक अव्वल प्रतिस्पर्धी कमी झाला आहे. या लढतीत थिएमने 18 बिनतोड सर्व्हिस करताना 74 विनर्सची बरसात केली. परंतु त्याच वेळी तब्बल 58 नाहक चुका करताना विजयाची संधी गमावली.

तरीही थिएमविरुद्ध जराही गाफील राहणे परवडणारे नसल्याची नदालला जाणीव होती. त्यातच यंदाच्या वर्षात नदालला पराभूत करणाऱ्या केवळ तीन खेळाडूंपैकी थिएम हा एक आहे. थिएमने माद्रिद स्पर्धेत नदालला क्‍ले कोर्टवर पराभूत करताना सनसनाटी निकालाची नोंद केली होती. त्यामुळे थिएमच्या क्षमतेचीही नदालला पुरेपूर कल्पना होती. थिएमने पहिलाच सेट 6-0 असा केवळ 24 मिनिटांत जिंकताना नदालला हादरा दिला. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत एकही गेम न जिंकता सेट गमावण्याची नामुष्की नदालवर केवळ चौथ्यांदा आली. नदालने दुसरा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. परंतु थिएम तिसऱ्या सेटमध्ये 5-3 अशी आघाडी घेत नदालवर दडपण आणले.

नदालने तिसरा सेटही 7-5 असा जिंकत सामन्यात 2-1 अशी आघाडी मिळविली. मात्र थिएमने त्याला स्वस्थता लाभू दिली नाही. तिसऱ्या सेटमध्ये 4-2 अशी आघाडी घेत त्याने नदालवर वर्चस्व गाजविले. नदालने हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. परंतु थिएमने टायब्रेकरमध्ये 7-6 (7-4) बाजी मारताना सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली. पाचवा सेट हा तर सामन्याचा दर्जा आणखीनच उंचावणारा ठरला. या वेळी मात्र नदालने टायब्रेकरमध्ये योग्य वेळी खेळ उंचावताना 7-6 (7-5) अशी बाजी मारत विजयाची निश्‍चिती केली.

हा सामना जिंकावा लागल्याबद्दल आपण थिएमकडे दिलगिरी व्यक्‍त केल्याचे नदालने सामन्यानंतर सांगितले. परंतु नदालला खरोखरीच खेद झाला असेल असे आपल्याला वाटत नसलल्याचे थिएमने सांगितले. आपल्या विधानाचे स्पष्टीकरण करताना थिएम म्हणाला की, नदाल हा एक महान खेळाडू असून त्याला कोणाकडूनही पराभूत होणे आवडणार नाही. अर्थात मी त्याला विजेतेपदासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. आमच्यातील आतापर्यंतचे सर्व सामने चुरशीचे झाले आणि भविष्यातही अशा अनेक लढती तुम्हाला पाहायला मिळतील अशी मला आशा आहे.

उपान्त्य सामन्यात नदालसमोर तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रोचे कडवे आव्हान आहे. चौथ्या उपान्त्यपूर्व लढतीत डेल पोट्रोने अमेरिकेच्या 11 व्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान 6-7 (5-7), 6-3, 7-6 (7-4), 6-2 असे संपुष्टात आणले. इस्नरच्या पराभवामुळे 2003 नंतर या स्पर्धेत पहिल्यांदाच अमेरिकन खेळाडू विजेता ठरण्याची शक्‍यता संपुष्टात आली.

या लढतीतही पहिला सेट 6-7 असा जिंकताना इस्नरने डेल पोट्रोला हादरा दिला. परंतु डेल पोट्रोने या संपूर्ण सामन्यात एकदाही आपली सर्व्हिस गमावली नाही आणि त्याचा परिणाम निकालात दिसलाच. पुढचे तीनही सेट जिंकताना डेल पोट्रोने नदालविरुद्ध सलग दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत उपान्त्य लढतीची निश्‍चिती केली. इस्नरविरुद्धच्या 12 लढतींमधील डेल पोट्रोचा हा आठवा विजय ठरला.

जोकोविच-मिलमन लढतीची प्रतीक्षा

सर्बियाचा माजी विजेता व सहाव्या मानांकित नोव्हाक जोकोविचसमोर उपान्त्यपूर्व फेरीत फेडररला चकित करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बिगरमानांकित जॉन मिलमनचे आव्हान आहे. तर अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत क्रोएशियाचा सातवा मानांकित मेरिन सिलिचला जपानच्या 21व्या मानांकित केई निशिकोरीशी झुंज द्यावी लागेल. विम्बल्डन विजेत्या जोकोविचला आता सलग दुसऱ्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची संधी आहे.

मनगटाच्या दुखापतीमुळे गेल्या वर्षीची अमेरिकन ओपन आणि यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनला मुकलेल्या निशिकोरीला सिलिचविरुद्ध 2014 मध्ये पत्करलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. न्यूयॉर्कमध्ये सध्या 33 अंश सेल्सिअस तापमान असून उष्णतेचा फटका सर्वच खेळाडूंना बसला आहे. जोकोविचप्रमाणेच नदालनेही आज मैदानावरच “आईस पॅक’ घेतला. इतकेच नव्हे तर सामना थांबवून 10 मिनिटांचा “हीट ब्रेक’ घेण्याची परवानगी पंचांनी खेळाडूंना दिली. तसेच कोर्टवरील उष्णता वाढल्यानंतर ज्युनियर गटातील अनेक सामने रद्द करण्याची वेळ संयोजकांवर आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)