#अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सेरेना-सेवास्तोव्हा उपान्त्य लढत रंगणार

गतविजेत्या स्टीफन्सला सेवास्तोव्हाचा धक्‍का

न्यूयॉर्क: अमेरिकेची सहा वेळची माजी विजेती सेरेना विल्यम्स आणि लात्वियाची 19वी मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा यांच्यात अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची पहिली उपान्त्यपूर्व लढत रंगणार आहे. या दोघींनीही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करीत आगेकूच केली.

आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील विश्‍वविक्रमी 24व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेना विल्यम्सने पहिल्या उपान्त्यपूर्व सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाविरुद्ध संथ प्रारंभानंतर आपला खेळ उंचावताना 6-4, 6-3 असा विजय मिळवून उपान्त्य फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत 19व्या मानांकित सेवास्तोव्हाने गतविजेत्या स्लोन स्टीफन्सचे आव्हान 6-2, 6-3 असे सहज संपुष्टात आणताना खळबळजनक विजयासह उपान्त्य फेरी गाठली.

त्याआधी सेरेनाला पहिल्या सेटमध्ये सूर गवसण्यास काही वेळ लागला. त्याचा फायदा घेत प्लिस्कोव्हाने 3-1 अशी आघाडी घेतली. परंतु सेरेनाने आपला संयम सुटू दिला नाही आणि सलग आठ गेम जिंकताना पहिला सेट तर जिंकलाच, शिवाय दुसऱ्या सेटमध्ये 4-0 अशी निर्णायक आघाडीही घेतली. या दरम्यान सेरेनाने आपल्या चुकांवर लक्षणीय नियंत्रण राखले होते. तसेच योग्य वेळी बिनतोड सर्व्हिस करताना तिने प्लिस्कोव्हाला निष्प्रभ केले. प्लिस्कोव्हाला या लढतीत मिळालेल्या 12 ब्रेक पॉइंटपैकी केवळ दोनचा उपयोग करून घेता आला.

सेरेनाने या लढतीत 13 बिनतोड सर्व्हिस करताना दुसऱ्या सेटमध्ये 5-3 अशा आघाडीनंतर अखेरच्या गेममध्ये तीन बिनतोड सर्व्हिस करताना प्लिस्कोव्हाला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. सेरेनाने कमाल ताशी 112 मैल (180 कि.मी.) वेगाने सर्व्हिस करून प्लिस्कोव्हावर वर्चस्व गाजविले. आता आपल्याला सूर गवसल्याचा विश्‍वास वाटत आहे, असे सेरेनाने सांगितले. ऑलिम्पिया या कन्यारत्नाला 1 सप्टेंबर 2017 रोजी जन्म दिल्यानंतर सेरेनाला अद्याप ग्रॅंड स्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

आणखी एका उपान्त्यपूर्व सामन्यात सेवास्तोव्हाने तृतीय मनानांकित स्लोन स्टीफन्सचा जमच बसू दिला नाही. पहिला सेट 6-2 असा जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्ये 4-1 अशी आघाडीवर असताना सेवास्तोव्हाला स्टीफन्सकडून कडव्या प्रतिकाराला तोंड द्यावे लागले. स्टीफन्सने आपली पिछाडी 3-5 अशी कमी केली. परंतु प्लिस्कोव्हाने तिसऱ्या मॅचपॉइंटला सामना संपवीत उपान्त्य फेरी गाठली.

आपल्या पराभवासाठी असह्य उष्ण हवामान किंवा अन्य कोणत्याही अडथळ्यांना दोष देण्यास स्लोन स्टीफन्सने नकार दिला. आज मला सूरच गवसला नव्हता, असे सांगून स्टीफन्स म्हणाली की, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्याही मी खेळाशी पूर्णपमे एकरूप होऊ शकले नाही आणि त्याचा परिणाम मला भोगावा लागला. दरम्यान उपान्त्य पेरीत सेरेनाशी झुंज द्यावी लागणार असल्यामुळे आपल्यावर दडपण असल्याची कबुली प्लिस्कोव्हाने दिली. सेरेनाला या स्पर्धेत 17वे मानांकन असले, तरी

ओसाकाच्या कामगिरीबद्दल उत्सुकता:
महिला एकेरीतील तिसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत स्पेनच्या 30व्या मानांकित कार्ला सुआरेझ नवारोसमोर अमेरिकेच्या 14व्या मानांकित मॅडिसन कीजचे कडवे आव्हान आहे. दोन दिवसांपूर्वीच तिसावा वाढदिवस साजरा करणाऱ्या सुआरेझ नवारोने “कम बॅक गर्ल’ मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणताना अमेरिकन ओपनमध्ये 2013 नंतर पहिल्यांदाच उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच महिला एकेरीतील अखेरच्या उपान्त्यपूर्व सामन्यात जपानच्या विसाव्या मानांकित नाओमी ओसाकाला युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया त्सुरेन्कोशी झुंज द्यावी लागेल. ओसाका ही 2004 नंतर अमेरिकन ओपनची उपान्त्यपूर्व फेरी गाठणारी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. त्यावेळी शिनोबू आसागोने ही कामगिरी केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)