अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : सेरेना विल्यम्स, स्लोन स्टीफन्स उपान्त्यपूर्व फेरीत

सेवास्तोव्हाचा स्विटोलिनावर सनसनाटी विजय

न्यूयॉर्क: सहा वेळची माजी विजेती सेरेना विल्यम्स आणि गतविजेती स्लोन स्टीफन्स या अव्वल अमेरिकन खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत धडक मारली. मात्र सातव्या मानांकित एलिना स्विटोलिनाचे आव्हान चौथ्याच फेरीत संपुष्टात आले.

सेरेनाला चौथ्या फेरीच्या लढतीत इस्टोनिायच्या बिगरमानांकित काइया कानेपीचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी 6-0, 4-6, 6-3 अशी कडवी झुंज द्यावी लाली. मातृत्व रजेतून पुनरागमन करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेनाने दोन वेळच्या विजेत्या व्हीनस विल्यम्सवर तिसऱ्या फेरीतच मात केली होती. या दोघींमधील ही एकूण तिसावी लढत ठरली होती. सेरेना व व्हीनस सर्वात पहिल्यांदा 1998 ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. या लढतीतील विजयामुळे व्हीनसविरुद्धच्या आकडेवारीत सेरेनाकडे 18-12 अशी आघाडी आहे.

सेरेनाने त्याआधी केरिन विथॉफ्टचा 6-2, 6-2 असा फडशा पाडला होता. पहिला सेट 6-0 असा जिंकल्यानंतर सेरेनाने दुसऱ्या सेटमध्ये दुहेरी चुका करताना कानेपीला 5-2 अशी आघाडी घेण्याची संधी दिली. कानेपीने ही संधी साधताना हा सेट 6-4 असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनाने आपला अनुभव पणाला लावताना बाजी मारली. सेरेनाने या लढतीत 18 बिनतोड सव्ह्रिस केल्या, तसेच 47 विनर लगावले.

सेरेनासमोर उपान्त्यपूर्व फेरीत झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाचे आव्हान आहे. प्लिस्कोव्हाने आपल्या दर्जाला साजेसा खेळ करताना ऑस्ट्रेलियाच्या ऍश्‍ले बार्टीचे आव्हान 6-4, 6-4 असे मोडून काढले. बार्टीने दोन्ही सेटमध्ये प्लिस्कोव्हाला कडवी झुंज दिली. परंतु प्लिस्कोव्हाने तिला संधी दिली नाही. प्लिस्कोव्हाने 2016च्या स्पर्धेत सेरेनावर उपान्त्य फेरीत खळबळजनक विजय मिळविला होता. त्यामुळे सेरेनाला या वेळी सावध राहावे लागणार आहे.
दरम्यान गतविजेत्या व तृतीय मानांकित स्लोन स्टीफन्सने बेल्जियमच्या 15व्या मानांकित एलिसे मेर्टेन्सचे आव्हान 6-3, 6-3 अशासरळ सेटमधील पराभवाने संपुष्टात आणले. मात्र स्टीफन्ससमोर उपान्त्यपूर्व फेरीत लात्वियाच्या 19व्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचे आव्हान आहे. सेवास्तोव्हाने चौथ्या फेरीच्या लढतीत युक्रेनच्या सातव्या मानांकित एलिना स्विटोलिनाचा 6-3, 1-6, 6-0 असा सनसनाटी पराभव करताना अखेरच्या आठ खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

क्‍विटोव्हा व कर्बर यांचे आव्हान संपुष्टात

बाविसाव्या मानांकित मारिया शारापोव्हासह 14वी मानांकित मॅडिसन कीज, विसावी मानांकित नाओमी ओसाका आणि 30वी मानांकित कार्ला सुआरेझ नवारो या मानांकित खेळाडूंनी चमकदार विजयांसह महिला एकेरीची चौथी फेरी गाठली. परंतु जर्मनीची चतुर्थ मानांकित अँजेलिक कर्बर आणि झेक प्रजासत्ताकाची पाचवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हा या प्रमुख महिला खेळाडूंचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. स्लोव्हाकियाच्या 29व्या मानांकित डॉमिनिका चिबुल्कोव्हाने अँजेलिक कर्बरची झुंज 3-6, 6-3, 6-3 अशी मोडून काढली. तर बल्गेरियाच्या 26व्या मानांकित आर्यना सबालेन्काने पाचवी मानांकित पेट्रा क्‍विटोव्हाला 7-5, 6-1 असा बाहेरचा रस्ता दाखवीत चौथी फेरी गाठली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)