अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नदालसमोर थिएमचे कडवे आव्हान

डेल पोट्रो, जॉन इस्नर उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

न्यूयॉर्क: अग्रमानांकित राफेल नदालने जॉर्जियाच्या बिगरमानांकित निकोलस बेसिलाश्‍विलीचा प्रखर प्रतिकार चार सेटमध्ये मोडून काडताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत आठव्यांदा धडक मारली. तसेच तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो, नववा मानांकित डॉमिनिक थिएम व 11वा मानांकित जॉन इस्नर या पुरुष मानांकितांनी वेगवेगळ्या शैलीत विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीतील उपान्त्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

बेसिलाश्‍विलीने सनसनाटी विजयांसह अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत धडक मारणारा जॉर्जियाचा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविला होता. हीच वाटचाल कायम राखताना त्याने नदालला जबरदस्त झुंज दिली. परंतु नदालने बेसिलाश्‍विलीवर 6-3, 6-3, 6-7, 6-4 अशा विजयासह आगेकूच केली. याआधी 2010, 2013 आणि 2017 मध्ये अमेरिकन ओपन जिंकणाऱ्या नदालने या विजयाबद्दल समाधान व्यक्‍त केले.

बेसिलाश्‍विली घणाघाती फटके लगावीत होता, असे सांगून नदाल म्हणाला की, मी जेव्हा जेव्हा आघाडी घेतली, तेव्हा तेव्हा त्याने जोरदार मुसंडी मारून मला प्रतिकार केला. बेसिलाश्‍विलीने नदालविरुद्ध 59 विनर्स लगावीत कडवी लढत दिली. परंतु त्याच वेळी 59 नाहक चुका करताना आपल्या प्रयत्नांवर पाणी फिरविले. नदालने या लढतीत जेमतेम 21 नाहक चुका केल्या. तर बेसिलाश्‍विलीने त्याच्या तिप्पट चुका करताना पराभव ओढवून घेतला.

नदालसमोर आता ऑस्ट्रियाच्या नवव्या मानांकित डॉमिनिक थिएमचे आव्हान आहे. 2018 या वर्षात नदालला पराभूत करणाऱ्या केवळ तीन खेळाडूंपैकी थिएम हा एक आहे. थिएमने फ्रेंच ओपन स्पर्धेपूर्वी झालेल्या माद्रिद स्पर्धेत नदालला क्‍ले कोर्टवर पराभूत करताना विक्रमी विजयाची नोंद केली होती. थिएमने चौथ्या फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या पाचव्या मानांकित केविन अँडरसनवर 7-5, 6-2, 7-6 अशी सनसनाटी मात करीत आगेकूच केली. थिएमला त्याआधी स्टीव्ह जॉन्सनला नमविण्यासाठी 6-7, 6-3, 5-7, 6-4, 6-1 अशी कडवी झुंज द्यावी लागली.

दरम्यान 2009 मध्ये ही स्पर्धा जिंकणाऱ्या डेल पोट्रोने क्रोएशियाच्या विसाव्या मानांकित बोर्ना कोरिकचा 6-4, 6-3, 6-1 असा पराभव करताना सलग तिसऱ्या वर्षी उपान्त्यपूर्व फेरी गाठली. त्याआधी डेल पोट्रोने अमेरिकेच्या डेनिस कुडलाचा 6-3, 6-1, 7-6 असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली होती.तृतीय मानांकित डेल पोट्रोसमोर उपान्त्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी अमेरिकेच्या 11 व्या मानांकित जॉन इस्नरचे आव्हान आहे. उपान्त्यपूर्व फेरीत शिल्लक राहिलेला तो एकमेव अमेरिकन खेळाडू आहे. इस्नरने कॅनडाच्या 25व्या मानांकित मिलोस रावनिचवर 3-6, 6-3, 6-4, 3-6, 6-2 अशी प्रदीर्घ लढतीनंतर मात करीत उपान्त्यपूर्व फेरी गाठली.

झ्वेरेव्ह, श्‍वार्त्झमन यांचे खळबळजनक पराभव

द्वितीय मानांकित रॉजर फेडरर व सहावा मानांकित नोव्हाक जोकोविच या माजी विजेत्यांसह सातवी मानांकित मेरिन सिलिच व 10वा मानांकित डेव्हिड गॉफिन या अव्वल खेळाडूंनी आकर्षक विजयाची नोंद करताना पुरुष एकेरीची चौथी फेरी गाठली. मात्र चतुर्थ मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह आणि 13वा मानांकित दिएगो श्‍वार्त्झमन या मानांकित खेळाडूंचे आव्हान तिसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. जपानच्या 21व्या मानांकित केई निशिकोरीने 13वा मानांकित दिएगो श्‍वार्त्झमनचा 6-4, 6-4, 5-7, 6-1 असा सनसनाटी पराभव करीत चौथी फेरी गाठली. तर जर्मनीच्या बिगरमानांकित फिलिप कोहेलश्रिबरने जर्मनीच्या चतुर्थ मानांकित अलेक्‍झंडर झ्वेरेव्हवर 6-7, 6-4, 6-3, 6-1 असा खळबळजनक विजय मिळवीत आगेकूच केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)