#अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: जोकोविचसमोर डेल पोट्रोचे आव्हान

पुरुष एकेरी विजेतेपदासाठी रंगतदार अंतिम लढतीची अपेक्षा 
न्यूयॉर्क: सर्बियाचा सहावा मानांकित नोव्हाक जोकोविच आणि अर्जेंटिनाचा तृतीय मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो या माजी विजेत्या खेळाडूंमध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. या दोन्ही खेळाडूंनी उपान्त्य लढतीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर परस्परविरुद्ध शैलीत मात करीत अंतिम फेरीची निश्‍चिती केली. याआधी 2011 आणि 2015 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या जोकोविचने उपान्त्य फेरीच्या लढतीत जपानचा विक्रमवीर व 21वा मानांकित केई निशिकोरीची आगेकूच 6-3, 6-4, 6-2 अशी रोखताना या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आठव्यांदा धडक मारली. जोकोविचने आपल्या कारकिर्दीत तब्बल 23 व्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
निशिकोरीने या स्पर्धेत अनेक चमकदार विजयांची नोंद करताना उपान्त्य फेरी गाठली होती. त्यात मेरिन सिलिचवरील विजयाचा समावेश होता. तसेच नाओमी ओसाकाच्या साथीत उपान्त्य फेरी गाठताना निशिकोरीने अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीच्या उपान्त्य फेरीत जपानच्या खेळाडूंनी धडक मारल्याची घटना तब्बल 22 वर्षांनंतर घडली होती. त्याआधी 2014 मधील अंतिम फेरीत सिलिचने निशिकोरीला पराभूत केले होते. निशिकोरीने ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारल्याची ती एकमेव घटना होती. त्यानंतर दुसऱ्यांदा हा मान मिळविण्याची निशिकोरीची संधी जोकोविचने संपुष्टात आणली.
त्याच वेळी दुसऱ्या उपान्त्य सामन्यात गतविजेत्या राफेल नदालने गुडघेदुखीमुळे दुसऱ्या सेटमध्ये सामना सोडून दिल्यामुळे डेल पोट्रोने निर्णायक विजय न मिळविताच अंतिम फेरीत स्थान मिळविले. नदालने असह्य वेदनेमुळे सामना सोडून दिला, तेव्हा डेल पोट्रो 7-6, 6-2 असा आघाडीवर होता. डेल पोट्रोविरुद्ध गेल्या 10 वर्षांतील आकडेवारीत जोकोविचकडे 14 विजय व 4 पराभव अशी निर्विवाद आघाडी आहे. त्यात अमेरिकन ओपनमध्ये 2007 आणि 2012 मधील विजयांचा समावेश आहे. या दोन्ही वेळा जोकोविचने एकही सेट न गमावता विजय मिळविले होते.
परंतु जोकोविच व डेल पोट्रो हे दोघे एकमेकांशी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम पेरीत कधीच खेळलेले नाहीत. डेल पोट्रोबद्दल माझ्या मनात एक माणूस आणि खेळाडू म्हणून अत्यंत आदर आहे. तो एक अफलातून खेळाडू आहे, असे सांगून जोकोविच म्हणाला की, ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम लढत कधीच सोपी नसते. मग ती कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असेल. नदालने माघार घेतल्यामुळे माझ्यासाठी विजेतपदाची वाट सोपी झाली आहे असे मला कधीच वाटणार नाही. डेल पोट्रो हा तितकाच दर्जेदार खेळाडू असून तो जगातील कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकतो.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)