अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: सेरेना – नाओमी अंतिम लढत रंगणार

दोन्ही खेळाडूंना विक्रमी कामगिरी करण्याची संधी

न्यूयॉर्क: सहा वेळची विजेती आणि आधुनिक काळातील सर्वोत्तम खेळाडू सेरेना विल्यम्स आणि केवळ 20 वर्षे वयाची जपानची युवा खेळाडू नाओमी ओसाका यांच्यात अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे. उद्या (शनिवारी) खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळवून या दोघींपैकी कोणत्याही खेळाडूने विजेतेपद पटकावले, तरी टेनिसविश्‍वात नवा इतिहास लिहिला जाणार आहे.

सतराव्या मानांकित सेरेनाने लात्वियाच्या 19व्या मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाचा प्रतिकार 6-3, 6-0 असा केवळ 66 मिनिटांत संपुष्टात आणताना अंतिम फेरी गाठली. गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये ऑलिम्पिया या कन्यारत्नाला जन्म दिल्यानंतर सेरेनाने सलग दुसऱ्यांदा ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी तिने विम्बल्डनच्याही अंतिम पेरीत स्थान मिळविले होते. प्रसूतीनंतर रुग्णालयात मला बेडवरून उठताही येत नव्हते. सध्या मी फारसा सरावही करीत नाही. तरीही एका वर्षानंतर मी दुसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाले आहे, असे सांगताना सेरेना भावुक झाली होती.

सेरेना विल्यम्सने आपल्या देदीप्यमान कारकिर्दीत तब्बल 23 ग्रॅंड स्लॅम विजेतेपदे पटकावली असून तिला आता विश्‍वविक्रमी 24व्या मुकुटाची प्रतीक्षा आहे. ख्रिस एव्हर्ट डॉईड आणि सेरेना यांच्यात सध्या प्रत्येकी 23 विजेतेपदांसह बरोबरी आहे. तर त्याच वेळी नाओमी ओसाका ही ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावणारी पहिलीवहिली जपानी महिला टेनिसपटू बनण्यासाठी उत्सुक आहे. ओसाका आणि केई निशिकोरी या जपानच्या खेळाडूंनी महिला व पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत धडक मारताना याआधीच नवा विक्रम केला आहे.

एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत जपानी खेळाडू पोहोचण्याची घटना 22 वर्षांनंतर घडली आहे. आता ओसाका आणि निशिकोरी हेदोघेही एकाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी करू शकतात की नाही, ही जगभरातील टेनिसशौकिनांना उत्सुकता आहे. विसाव्या मानांकित नाओमी ओसाकाने अमेरिकेच्या गतउपविजेत्या मॅडिसन कीजचे आव्हान 6-2, 6-4 असे मोडून काढताना कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चौदाव्या मानांकित मॅडिसनला घरच्या मैदानावर खेळताना प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा लाभला. परंतु ओसाकाने जराही विचलित न होता विजयाची पूर्तता केली. विशेष म्हणजे मॅडिसनवर ओसाकाचा हा पहिलाच विजय ठरला.

मॅडिसनला या सामन्यात तब्बल 13 ब्रेक पॉइंट मिळाले. परंतु त्यातील एकदाही ओसाकाची सर्व्हिस भेदण्यात तिला यश मिळाले नाही. एकही दुहेरी चूक करायची नाही, असे आपण स्वत:ला बजावले होते, असे ओसाकाने सामन्यानंतर सांगितले. ओसाकाने त्याआधी युक्रेनच्या बिगरमानांकित लेसिया त्सुरेन्कोचा 6-1, 6-1 असा सरळ सेटमध्ये धुव्वा उडविताना कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली होती.

नाओमी ओसाका ही कोणत्याही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. याआधी दोन दशकांपूर्वी शिनोबू आसागोने अमेरिकन ओपनची उपान्त्य फेरी गाठली होती. तसेच किमिको डाटेने 1995 मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीची उपान्त्य फेरी गाठली होती. त्यानंतर ओसाकाने त्यांच्या पलीकडे मजल मारली आहे. मॅडिसन कीजने उपान्त्य सामन्यात मारिया शारापोव्हाला चकित करणाऱ्या 30व्या मानांकित सुआरेझ नवारोचे आव्हान संपुष्टात आणले होते. मात्र ओसाकाचे घणाघाती फटके आणि अचूक प्लेसमेंट यापुढे तिला काहीच करता आले नाही.

सेरेनाच्या झंझावातासमोर सेवास्तोव्हा निष्प्रभ

सेरेना विल्यम्सने दुसऱ्या उपान्त्य लढतीत ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हाला सरळ सेटमध्ये पराभूत करताना आपली आगेकूच कायम राखली. सेरेना विल्यम्सने उपान्त्यपूर्व सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर विजय मिळवून उपान्त्य फेरीत धडक मारली होती. तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत 19व्या मानांकित सेवास्तोव्हाने गतविजेत्या स्लोन स्टीफन्सचे आव्हान संपुष्टात आणले होते. परंतु सेरेनाच्या आक्रमणासमोर सेवास्तोव्हा सपशेल निष्प्रभ ठरली. सेरेनाने नेटजवळ धाव घेताना 28पैकी 24 गुण जिंकत सामन्यावर वर्चस्व गाजविले. सेरेनाच्या ताशी 193 किलोमीटर वेगाच्या झंझावाती सिर्व्हससमोर सेवास्तोव्हाकडे कोणतेही उत्तर नव्हते. सेरेना सहसा इतक्‍या वेळा नेटकडे धाव घेऊन आक्रमण करीत नाही. परंतु या वेळी आपण डावपेचांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून सेरेना म्हणाली की, मी सध्या व्हॉलीजचा सराव करीत आहे. त्याचे प्रात्यक्षिक करण्यास मी उत्सुक होते आणि निकाल पाहून तुम्हालाही त्याचा परिणाम समजलाच असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)