अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा: नाओमी ओसाका नवी पोस्टर गर्ल

न्यूयॉर्क: ओसाका ही 2004 नंतर अमेरिकन ओपनची उपान्त्यपूर्व फेरी गाठणारी पहिली जपानी खेळाडू ठरली आहे. त्यावेळी शिनोबू आसागोने ही कामगिरी केली होती. तसेच याआधी किमिको डाटे आणि शुझो मात्सुओका या जपानी खेळाडूंनी 1995 मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीची उपान्त्य फेरी गाठली होती. त्यानंतर ओसाका आणि निशिकोरी यांनी हा मान मिळविला आहे.

डाटे-मात्सुओकाच्या विक्रमी कामगिरीच्या वेळी नाओमी ओसाकाचा जन्मही झाला नव्हता. परंतु आज ओसाका केवळ जपानमधीलच नव्हे तर अमेरिकेतील नवी “पोस्टर गर्ल’ ठरली आहे. उपान्त्यपूर्व फेरीतील विजयानंतर आपल्याला अश्रू आवरले नसल्याची कबुली दिल्यामुळे ओसाकावर टीका झाली. परंतु महान खेळाडू बिली जीन किंग आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांनी तिची बाजू घेतली.

बालपण जपानमध्ये गेल्यानंतर ओसाका अमेरिकेत स्थायिक झाली असून तिची टेनिस कारकीर्द येथेच बहरली आहे. त्यामुळेच तिने जपानी माध्यमांशी सफाईदार इंग्रजीत संवाद साधलाच, शिवाय जपानी वाक्‍यांची पखरण करून सर्वांना सुखद धक्‍काही दिला. निशिकोरी हा मला भेटलेल्या अत्यंत सज्जन माणसांपैकी एक आहे, असे सांगून ओसाका म्हणाली की, मी पहिल्यांदा त्याच्याशी बोलू लागल्यावर त्याला आश्‍चर्य वाटल्याचे दिसले. परंतु आता आमच्यातील मैत्रीची कबुली मला द्यावी लागत आहे.

उपान्त्य सामन्यात ओसाकासमोर अमेरिकेच्या 14व्या मानांकित मॅडिसन कीजचे आव्हान आहे. नुकताच तिसावा वाढदिवस साजरा करणाऱ्या 30व्या मानांकित सुआरेझ नवारोने “कम बॅक गर्ल’ मारिया शारापोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले होते. मात्र मॅडिसन कीजने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नवारोचा प्रतिकार 6-4, 6-3 असा मोडून काढताना अखेरच्या चार खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.

अमेरिकेची सहा वेळची माजी विजेती सेरेना विल्यम्स आणि लात्वियाची 19वी मानांकित ऍनेस्तेशिया सेवास्तोव्हा यांच्यात महिला एकेरीची दुसरी उपान्त्य लढत रंगणार आहे. विश्‍वविक्रमी 24व्या ग्रॅंड स्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्नशील असलेल्या सेरेना विल्यम्सने उपान्त्यपूर्व सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या आठव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हावर विजय मिळवून उपान्त्य फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपान्त्यपूर्व लढतीत 19व्या मानांकित सेवास्तोव्हाने गतविजेत्या स्लोन स्टीफन्सचे आव्हान संपुष्टात आणले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)