अमेरिकन ओपन टेनिस : नाओमी ओसाकाचा गतविजेत्या कर्बरला धक्‍का 

न्यूयॉर्क – जपानची उदयोन्मुख युवा टेनिसपटू नाओमी ओसाका हिने जर्मनीच्या गतविजेत्या अँजेलिक कर्बरवर सनसनाटी मात करताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली. अत्यंत अनपेक्षित निकालाची नोंद झालेल्या या सामन्यात केवळ 19 वर्षीय नाओमीने अँजेलिक कर्बरचे आव्हान 6-3, 6-1 असे मोडून काढताना महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली.

गेल्या वर्षी तिसऱ्या फेरीत मॅडिसन कीजविरुद्ध निर्णायक सेटमध्ये 5-1 अशी आघाडीवर असताना नाओमीने संधी गमावली होती. त्यामुळे त्या पराभवाचे सावट तिच्या मनावर अद्यापही होते. त्यानंतर या वर्षी पहिल्याच फेरीत सेंटर कोर्टवर गतविजेतीशी खेळताना तिच्या मनावर प्रचंड दडपण होते. स्टेडियममध्ये प्रचंड संख्येने जमलेल्या प्रेक्षकांना पाहूनही तिच्यावर वेगळे दडपण आले होते. परंतु या सगळ्याचा यशस्वी सामना करताना नाओमीने आपल्या छोट्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय विजयाची नोंद केली.

नाओमी व्हीनस विल्यम्सविरुद्ध विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत पराभूत झाली होती. मात्र त्या सामन्यातील अनुभवाचा आपल्याला आज फायदा जाल्याचे तिने सांगितले. नाओमी सध्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड टेलर यांचे मार्गदर्शन घेत आहे. टेलर यांनीच समंथा स्टोसूरला 2011 मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद मिळवून दिले होते. दरम्यान स्वेतलाना कुझ्नेत्सोव्हानंतर (2005) पहिल्याच फेरीत पराभूत होणारी कर्बर ही अमेरिकन ओपनमधील पहिली गतविजेती ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)