अमृतमय संजीवनी कपालभाती (भाग- १)

भगवान पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील “प्राणायाम’ हे चौथे अंग आहे.हे तर आपणा सर्वांना चांगले माहीत आहे. प्राणायाम चांगल्या प्रकारे साधणे हे अवघड असले तरी अशक्‍य मात्र नाही. सतत नियमित प्राणायामाची साधना करणे आवश्‍यक आहे. एकदा का प्राणायाम चांगला जमू लागला की प्रत्याहाराच्या द्वारातून अंतरंग योगाचा प्रवेश सुरू होतो. प्राणायाम चांगल्या प्रकारे साधण्यासाठी दीर्घकाल कुंभकाचीही सातत्याने प्रॅक्‍टिस व्हायला हवी. योग साधकाच्या प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासाने कुंभकाचा कालावधी वाढवता येतो. त्यासाठी साधकाला शुद्धिक्रियांचीही गरज असते.

कपालभाती एक शुद्धिक्रिया
कपालभाती ही हठप्रदीपिकेत सांगितलेल्या सहा शुद्धिक्रियांपैकी एक सोपी व लाभदायी शुद्धिक्रिया आहे. कपालभाती केल्याने संपूर्ण श्‍वसनमार्ग व श्‍वसनेंद्रिये यांची शुद्धी होते. प्राणायामाच्या अभ्यासात मुख्य क्रिया म्हणजे कुंभक, जसजसा कुंभकाचा कालावधी वाढेल तसतसे प्राणायामाचे फायदे अधिकाधिक मिळत जातील व कुंभकाचा कालावधी कपालभाती केल्यामुळे वाढतो व कपालभातीचा कालावधी अंतर्गत आणि बाह्य कुंभकाने वाढतो.

कपालभाती केली की त्याचे लगेच आपल्या शरीरावर होणारे परिणाम वमनधौतीप्रमाणे दिसत नाहीत. पण ते शरीरांतर्गत परिणाम कपालभातीला सुरुवात केल्यापासून सातत्याने रोज केल्यामुळे होत असतात. तरीसुद्धा दरवेळी नाडीशुद्धी प्राणायाम करण्यापूर्वी आपण आधी कपालभाती करतो, तसे करायला सांगितले जाते म्हणून कपालभाती करतो पण त्यामुळे नक्‍की काय फायदा होतो? कपालभातीचे परिणाम काय होतात? हे नियमित करणाऱ्याला लगेचच प्रत्ययास येते.

कपालभाती हा तसा प्राणायामाचाच एक प्रकार, पण प्रत्यक्ष प्राणायाम नाही. या प्रक्रियेत रेचक पूरकाच्या (कुंभकशिवाय) जलद आवृत्या केल्या जातात. म्हणजेच पूरक रेचक एकाच पद्धतीने नसल्याने जलद श्‍वसनही नाही. आणि संथ नसल्याने दीर्घ श्‍वसनही नाही. ही शुद्धी प्रक्रिया श्‍वसनाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. यामध्ये प्रयत्नपूर्वक रेचक आणि सहज पूरक होते. श्‍वसनमार्गाच्या शुद्धीची ही प्रक्रिया आहे. कपालभातीची मूळ प्रक्रिया म्हणजे विशिष्ट पद्धतीने प्रयत्नपूर्वक केलेला रेचक, पूरक हा नाममात्र आहे. ह्या प्रक्रियेत रेचक महत्त्वाचा आहे. रेचक करताना पोटाच्या स्नायूंच्या आधाराने आत जोरदार धक्‍का देऊन रेचक करायचा असतो. म्हणजेच लोहाराच्या भात्याप्रमाणे फक्‍त उत्सर्जनाची क्रिया केली जाते.

श्‍वासपटल व पोटाचे स्नायू यांची आतल्या दिशेने जोरदार झटक्‍याने वर खेचून धक्‍का देऊन रेचक करायचा. श्‍वास बाहेर सोडायचा. रेचक दीर्घ नाही. धक्‍का मारून रेचक केल्यावर पोटाचे स्नायू व श्‍वासपटलाचे स्नायू ढिले सोडले की आपोआपच श्‍वास आत घेतला जातो. म्हणजेच सहज पूरक व प्रयत्नपूर्वक रेचक होय. एक पूरक व एक रेचक केले म्हणजे कपालभातीचे एक आवर्तन होत नाही.

पद्‌मासनात बसून संथ श्‍वसन करायचे व श्‍वास घेऊन कपालभातीला सुरुवात करायची. शक्‍य आहे तोवर न थांबता कपालभाती करत राहावे. थांबून संथ श्‍वसन म्हणजेच 15 सेकंद विश्रांती व श्‍वास घेऊन कपालभातीला सुरुवात करायची. अशी एकेक मिनिटाची तीन आवर्तने करावीत. एका मिनिटात सहजपूरक होते व रेचकाच्या 120 आवृत्या कराव्यात.

कपालभातीच्या प्रक्रियेत अनिच्छावर्ती मज्जासंस्थेच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या श्‍वासपटलाच्या स्नायूंकडून त्यांच्यावर ताबा मिळवून नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात व जलद हालचाली करून घेतल्या गेल्यामुळे श्‍वसनप्रक्रियेतील महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालीमुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे त्याची लवचिकता वाढते व नेहमीकरताच श्‍वसन अधिक कार्यक्षम व परिणामकारक होऊ शकते.

कपालभाती या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक रेचक व सहज पूरकामुळे हवेचा एक जोरदार झोत निर्माण होतो व हा झोत बाहेरच्या दिशेने प्रवाहित होतो. त्या झोताबरोबर श्‍वसनमार्गातील कचरा, धूलीकण, घाण बाहेर टाकायला मदत होते. वायुकोषांपासून पुढचा श्‍वसनमार्ग स्वच्छ होतो. जोरदार रेचक व अल्पपूरक यामुळे हा कचरा पुढे पुढे सरकत जातो व शरीराबाहेर टाकला जातो. रेचकाच्या धक्‍क्‍यामुळे मेंदूवर व मज्जासंस्थेवर चांगले परिणाम होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. कपालभातीमुळे शरीराला प्राणवायूचा पुरवठा अधिक होतो.

श्‍वसनाच्या इंद्रियांवर जरूर पडेल तसे नियंत्रण ठेवणे शक्‍य होते. म्हणून प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी कपालभातीची आवर्तने केल्यास प्राणायामाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येतो. हठप्रदीपिकेत कपालभातीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.
भस्त्रावल्लोहकारस्य रेचपुरौ ससंभ्रम्नो।
कपालभातिर्विख्यात कफदोषविशोषणी।। 2 -36।।
लोहाराच्या भात्याप्रमाणे रेचक व पूरक जलद गतीने केले जातात (रेचक आहे का पूरक याचा संभ्रम व्हावा अशा पद्धतीने) त्याला कपालभाती असे म्हणतात. याच्या अभ्यासाने कफदोष नाहीसे होतात. याबाबत घेरंडसंहिताकार व हठप्रदिपिकाकार यांचे एकमत आहे. कपालभातीमुळे कुंभकाचा कालावधी वाढतो.

यासाठी नियमितपणे कपालभाती करणे आवश्‍यक आहे. कपालभातीची आवर्तने प्रत्येक साधकाने नियमित करावीत. दरवेळी कुंभकाचा कालावधी लिहून ठेवावा. हे सर्व पद्‌मासन किंवा ध्यानात्मक आसनात करावे. आसनात पाठीचा कणा ताठ ठेवून पाठीचा कणा, मान व डोके एका रेषेत येईल, अशा तऱ्हेने आसनस्थ व्हावे.

आसनस्थ झाल्यावर एक मिनिट संथ श्‍वसन करावे. संथ श्‍वसन म्हणजे ज्यात पूरक रेचक ह्यासाठी काहीही वेगळे प्रयत्न केले जात नाहीत, म्हणजेच नेहमीचे श्‍वसन करावे.
संथ श्‍वसनानंतर जास्तीत जास्त सावकाश पूरक करावा. हाताची प्रणवमुद्रा बांधून नाक बंद करावे. शक्‍य होईल तेवढा कुंभक (म्हणजे अभ्यंतर) ठेवावा व नंतर प्रणवमुद्रा सोडून सावकाश रेचक करावा.

या प्रक्रियेत श्‍वास रोखल्यावर म्हणजेच नाक बंद केल्यापासूनचा कालावधी मोजण्यास सुरुवात करावी व प्रणवमुद्रा सोडेपर्यंतचा कालावधी मोजावा. “हा कालावधी कुंभककाल होय.’ रेचक करून झाल्यावर पुन्हा एक मिनिट संथ श्‍वसन करावे. अशा प्रकारे तीन आवर्तने करावीत. दोन आवर्तनात 15 सेकंद विश्रांती घ्यावी.

वरील तीन आवर्तनानंतर एक मिनिट विश्रांती घेऊन, मग कपालभातीची प्रक्रिया करावी. कपालभातीमध्ये एका आवर्तनामध्ये किती धक्‍के दिले जातात याची नोंद करावी. अशा प्रकारे तीन आवर्तने करून प्रत्येक आवर्तनामागील धक्‍क्‍यांची संख्या नोंदवावी. तिसऱ्या आवर्तनानंतर एक मिनिट संथ श्‍वसन करून श्‍वास सोडून, श्‍वास घ्यावा व कुंभक करावे.

कपालभाती करण्यापूर्वीचे कुंभकाचे सेकंद व कपालभाती केल्यानंतरचा कुंभकाचा कालावधी याची नोंद केली असता असे लक्षात येते की कुंभकाचा कालावधी वाढतो. कपालभाती म्हणजे मेंदूची कवटी स्वच्छ करण्याची क्रिया. कपालभाती प्रक्रियेद्वारा मेंदूतील अनेक द्वारे उघडली जातात. मन ताजेतवाने होते. उत्साहवर्धक वाटते. विविध रोगांवर कपालभाती हा उपचार योगशास्त्राने मान्य केला आहे.

तसेच स्थुलत्व निवारणासाठीदेखील कपालभाती तंत्र अवलंबिले जाते. याबाबत स्वामी कुवलानंद, स्वामी रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर, श्रीविश्‍वासराव मंडलीक, श्री अय्यंगार, श्री डॉ. करंदीकर अशा अनेक तज्ज्ञांनी संशोधन केले आहे. कपालभातीची संजीवनी सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य अनेक योगाचार्य करत आहेत. सर्वसामान्यांनी कपालभाती करताना आपल्या मनाने करू नये. तर योग्य योगतज्ञाचा सल्ला घेऊन त्याच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्‍त पद्धतीने शिकून मगच कपालभातीचा नियमित सराव करावा.

सुजाता टिकेकर 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)