पिंपरी – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांची अभ्यास मंडळ सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
उच्च शिक्षणाची उद्दीष्टे साध्य होण्यासाठी विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबरच महाविद्यालयाचाही त्यात सहभाग असावा या उद्देशाने निवडणुकीच्या माध्यमातून विद्या परिषद, अधिसभा सदस्य, अभ्यास मंडळ सदस्य यांची नेमणूक केली जाते. त्यासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाला अभूतपूर्व यश लाभले.
प्राचार्य डॉ. घोरपडे यांची बिझिनेस प्रॅक्टीस या विषयासाठी अभ्यास मंडळ सदस्य म्हणून बहुमताने निवड झाली. डॉ. घोरपडे हे गेली 25 वर्षे वाणिज्य विषयाचे प्राध्यापक म्हणून तर 9 वर्षे प्राचार्य म्हणून काम करीत आहेत. यापूर्वी त्यांनी पुणे विद्यापीठ अभ्यास मंडळ सदस्य, विद्या परिषदेचा सदस्य म्हणून काम केलेले आहे. एम. फील व पीएच. डी या दोन्ही पदव्यांबरोबरच त्यांचे तीन मोठे व एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
विविध विषयांवरील 12 पुस्तकांचे लेखन, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील 34 जर्नल्समध्ये शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. मस्कत, ओमान, सिंगापूर बॅंकॉक, मलेषिया, तेहरान आणि बार्सिलोना – स्पेनसह 49 आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावरील चर्चासत्रामध्ये 49 शोध निबंधांचे वाचन त्यांनी केले आहे. वाघीरे महाविद्यालयातील संगणकशास्त्र विभागातील डॉ. विलास वाणी यांचीही अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून बहुमताने निवड झाली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा