अभ्यास दौरा की श्रमपरिहार

संदीप राक्षे
सातारा, दि. 2 – राष्ट्रवादीच्या अंतर्गत श्री विसजर्नच्या झळांनी झालेली राजकीय होरपळ शांत करण्यासाठी आता अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृत्रिम तळ्याच्या वैतागाचा श्रमपरिहार आता स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल ठरलेल्या इंदौरमध्ये होणार आहे. या दौऱ्याला नुकतीच सातारा पालिकेच्या स्थायी समितीने मंजूरी दिली आहे . हे बजेट तब्बल पाच लाख रुपये असल्याची चर्चा आहे . या अभ्यास दौऱ्याचे शिष्टमंडळ मात्र जम्बो असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्ये पाचगणी व कराड या “ब’ वर्ग पालिकांनी चमकदार कामगिरी नोंदवल्याने येत्या 24 ऑक्‍टोबर रोजी टोकियो येथे होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेसाठी कराड पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे व पाचगणी पालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे यांची निवड झाली आहे . सातारा पालिकेच्या स्वच्छता अभियानाने कागदोपत्री कोट्यवधीच्या बिलांची स्वच्छता केली पण प्रत्यक्षात साताऱ्यातला किती कचरा हटला याचे स्पष्ट हिशोब आहे . रोजच्या चाळीस टन कचऱ्यापैकी तब्बल आठ टन कचरा तांत्रिक कारणामुळे शहराच्या गल्लीबोळात पडून आहे . देशपातळीवर 59 व्या क्रमांकावर सातारा शहराच्या स्वच्छतेचा झेंडा लावणारी सातारा पालिका आता कराड नंतर इंदौर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर निघाली आहे . या दौऱ्यात इंदौर महानगरपालिकेने सोलर एनर्जी प्रकल्प, कचऱ्यापासून खतनिर्मिती, घरटी शौचालये, भुयारी सांडपाणी योजना अशा विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहे. या दौऱ्याला पाच लाखाची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली असून कदाचित पन्नास सदस्यांची जंबो कमिटी येत्या 21 ऑक्‍टोबरला इंदौरला रवाना होणार असल्याची दाट शक्‍यता आहे.

अभ्यास दौरा की श्रमपरिहार
सातारा पालिकेचा इंदौर दौरा हा अभ्यास दौरा की राजकीय सहल अशा कुजबुजीला सुरवात झाली आहे . कृत्रिम तळ्यावरून सातारा विकास आघाडीचा झालेला राजकीय छळवाद कदाचित इंदौरच्या तळ्यात विसर्जित होईल. लोकसभेच्या तयारीला लागण्याकरिता दिवाळीपूर्वी एखादा चेंजिंग बूस्टर हवाच या मुद्द्यावर कधीही न पटणाऱ्या सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी, व भाजप यांचे एकमत झाले आहे. त्यात पत्रकार किती घ्यायचे व कोणाला घ्यायचे यावर सुध्दा राजकीय खल सुरू आहे . मात्र अभ्यास दौरा अलिशान कसा राहिल याचा मात्र खाजगीत आग्रह धरला जात आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)