अभ्यासेत्तर उपक्रम मूळ अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे – प्रकाश जावडेकर

पुणे – संवाद साधणे, एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्याचे विश्‍लेषण करणे हे खरे शिक्षण. त्यामुळे आपण ज्याला “एक्‍स्ट्रा करिक्‍युलर’ अर्थात अभ्यासेतर उपक्रम म्हणतो ते देखील मूळ अभ्यासक्रमाइतकेच महत्त्वाचे असायला हवेत, असे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

मालपाणी फाउंडेशनच्या “ध्रुव ग्लोबल स्कूल’ या शाळेचे जावडेकर यांच्या हस्ते नांदे येथे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. गोविंददेव गिरी महाराज, खासदार संजय काकडे, अभिनेता राहुल सोलापूरकर, ध्रुव ग्लोबल स्कूलचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी, मालपाणी समूहाचे राजेश, आशिष, मनीष आणि गिरिश मालपाणी, शाळेच्या प्राचार्या संगीता राऊत आदी या वेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जावडेकर म्हणाले, देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम शिक्षण मिळणे गरजेचे असून त्यासाठी सरकारबरोबरच खासगी क्षेत्राचीही भूमिका महत्त्वाची आहे. तसेच यापुढे सीबीएसई शाळांना परवानगी देताना संबंधित शाळेची प्रत्यक्ष कामगिरी अर्थात “लर्निंग आऊटकम’ काय आहे ते प्रामुख्याने तपासले जाईल आणि शाळेतील इतर सोयीसुविधांविषयीचे प्रमाणपत्र जिल्हा नियमन अधिकारी देतील. तसेच जावडेकर यांनी “अटल टिंकरिंग लॅब,’ “समग्र शिक्षा,’ “स्वच्छ विद्यालय’ यावर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.

डॉ. संजय मालपाणी म्हणाले, “ध्रुव ग्लोबल स्कूल ही मालपाणी समूहाची सामाजिक बांधिलकी असून शिक्षण हा आमच्यासाठी व्यवसाय नाही, तर पुढील पिढीचे भविष्य घडवण्यासाठीची ती गुंतवणूक आहे.’

पाठ्यक्रम कमी करण्याचा सरकारचा निर्णय
“मुले अभ्यासाच्या ओझ्याखाली दबून जाऊ नयेत आणि त्यांना खेळ, जीवन कौशल्ये आणि अनुभव शिक्षणासाठी वेळ मिळावा म्हणून वर्गातील पाठ्यक्रम टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे,’ असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)