अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे घडलो – बाबासाहेब पुरंदरे

नवी दिल्ली – अभ्यासपूर्ण वाचन व लेखनामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घरा-घरात पोचवू शकलो, अशा भावना महाराष्ट्र भूषण व ज्येष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज व्यक्त केल्या.
महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार व अनौपचारीक गप्पांचा कार्यक्रम आज महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित करण्यात आला. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्प गुच्छ देऊन बाबासाहेबांचे स्वागत, तर ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची उंची विश्वव्यापी आहे. योध्दा, मुत्सद्दी नेता, कुटनीतीतज्ज्ञ, पूत्र, पती, वडील असे विविध पैलू महाराजांच्या व्यक्तीमत्वाला आहेत. महाराजांच्या व्यक्तीमत्वाची भुरळ विदेशी लेखक व नेत्यांनाही पडली. नेत्से, विस्टन चर्चिल, लेनीन या जागतिक नेत्यांप्रमाणे शिवाजी महाराजांची दूरदृष्टी होती. तत्कालीन ब्रिटीश शासक जेम्स डग्लस यांनी ठाणे-मुंबई या रेल्वे प्रवासात डोंगरावर पाहिलेला भला मोठा किल्ला आणि त्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाविषयी त्यांनी केलेला अभ्यास याविषयी बाबासाहेबांनी यावेळी सविस्तरपणे सांगितले. जेम्स डग्लस यांनी लिहीलेले “बुक ऑफ बॉम्बे’ व त्यातील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे वर्णन आदींबाबतही त्यांनी माहिती दिली.

परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रात्साविक केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिचय केंद्राच्या अधिकारीकर्मचा-यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अधोरेखीत करणारा पोवाडा सादर केला. यावेळी परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, पत्रकार आणि कार्यालयाला भेट देणारे अभ्यागत मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)