अभियोग्यता चाचणींच्या पात्र उमेदवारांमध्ये चारशेची तफावत

“टायपिंग मिस्टेक’ की “गौंडबंगाल’: सर्व पात्र उमेदवार चिंतेत
– शिक्षक भरती वादात सापडण्याची चिन्हे

पुणे- राज्यात सहा वर्षांनंतर होणारी शिक्षक भरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. अभियोग्यता चाचणीतील पात्र उमेदवारांची संख्या परीक्षा परिषदेकडून वेगळी व महाआयटी विभागाकडून वेगळी दिली गेली आहे. त्यातच बारा ते पंधरा लाखांत गुण वाढवून देतो असे सांगणाऱ्या ऑडिओ क्‍लिपही व्हारयल झाल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीतील तफावत ही टायपिंगमधील चूक आहे की आणखी काही मोठे रॅकेट याचा खुलासा लवकर होणे गरजेचे आहे.

मुख्य म्हणजे अभियोग्यता चाचणी ही आम्ही घेतली नसून आयटी विभागाने घेतली आहे. त्यामुळे त्याचे गुणांकनही त्यांनीच केले आहे, आम्ही केवळ परीक्षेचे नियोजन केले होते. आम्हाला गुणांची जी यादी मिळाली ती त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. त्यामुळे याबाबत आम्ही कोणताही अधिकचा तपशील देऊ शकणार नाही. अशा प्रकारच्या क्‍लिप्स काही नापास झालेल्या विद्यार्थ्यांकडून खोडसाळपणे संभ्रम निर्माण करण्याच्या हेतूने केलेल्या असू शकतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये. असे प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिसात तक्रार द्यावी.
– सुखदेव डेरे, आयुक्‍त, राज्य परीक्षा परिषद

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे येत्या काळात वीस हजारांपेक्षा जास्त शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यासाठी शासनाने नुकतीच अभियोग्यता चाचणीही घेतली. यासाठी राज्यातून 97 हजार 520 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, त्यातील 1 लाख 71 हजार 348 उमेदवारांनी ही चाचणी दिली. या चाचणीचा निकाल 1 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, परीक्षा घेतलेल्या आयटी विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आकडेवारी व परीक्षा परिषदेकडून देण्यात आलेली आकडेवारी यात चारशे पात्र उमेदवारांचा फरक दिसत असल्याचे समोर आले आहे. दोनशे गुणांच्या या चाचणीमध्ये 141 ते 160 या गुणांच्या गटात 450 विद्यार्थी पात्र आहेत, असे आयटी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर, याच गटात 850 विद्यार्थी पात्र असल्याचे परीक्षा परिषदेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. दरम्यान, आयटी विभागाकडून शून्य गुण मिळालेल्या उमेदवारांची यादीच जाहीर न केल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.

एकतर कितीतरी वर्षांनी अखेर आम्हाला शिक्षक म्हणून शिक्षण विभाग स्विकारत आहे. त्यातच असा हा घोळ, अशा ऑडिओ क्‍लिप्स यामुळे आमची आहे ती संधी जाईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत आम्हाला आमच्या निकालाची हार्डकॉपी मिळावी तसेच शासनाने समोर येऊन हा सर्व घोळ काय आहे ते स्पष्ट करावे.
– प्राजक्‍ता गोडसे, पात्र उमेदवार, जेऊर

दरम्यान, याच कालावधीत तुम्हाला पवित्र प्रणालीमध्ये पात्र उमेदवारांच्या यादीत घालून देतो यासाठी बारा ते पंधरा लाख रुपये द्या असे संभाषण असणाऱ्या काही ऑडिओ क्‍लिप देखील व्हायरल झाल्या असून पात्र उमेदवारांची संख्या अचानक चारशेने वाढलेली दिसत असल्यामुळे सर्वच पात्र विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

राज्यातील पात्र उमेदवार धास्तावले..
एकूणच या प्रकारामुळे राज्यातील गेल्या सहा वर्षांपासून चातकाप्रमाणे शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या पात्र उमेदवारांना मात्र मोठी चिंता पडली आहे. त्यातच व्हारयल झालेल्या क्‍लिपमध्ये काही अधिकाऱ्यांची नावेही आहेत. अनेक परीक्षांच्या दिव्यातून पुढे आल्यानंतर आता सीईटी 2010 प्रकरणासारखा घोळ तर शिक्षण विभाग घालणार नाही ना, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

आकडेवारीतील जर टायपिंगमधील चूक असेल तर ती प्रशासनाने वेळीच समोर येऊन जाहीर करणे गरजेचे आहे; किंवा यामध्ये काही गौंडबंगाल असेल तर त्यांचा वेळीच खुलासा करणे गरजेचे आहे. दरम्यान, याबाबत महाआयटी विभागाच्या हेल्पलाईनवर संपर्क केला असता ही आकडेवारी आमच्याकडे नसल्याचे उत्तर देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)