अभियंत्यांच्या सेवाज्येष्ठता यादीचे एकत्रीकरण

  • न्यायालयाचे आदेश : महापालिका प्रशासनाची कार्यवाही

पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थापत्य विभागात डिग्री व डिप्लोमाधारक अभियंत्यांची सेवाज्येष्ठता यादी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. ती यादी एकत्रित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासन व पालिकेस दिले आहेत. ही कार्यवाही दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेने अभियंत्यांची सेवाज्येष्ठता यादी एकत्रीकरणाचे काम सुरू केले आहे.

या संदर्भात अभियंता आबासाहेब ढवळे व धनंजय गवळी यांनी उच्च न्यायालयात 2015 मध्ये याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. पालिकेच्या 1983 च्या सर्वसाधारण सभेत ठराव करून नागरी सेवा नियम लागू करण्यात आला होता. कोणत्याही पदासाठी शिक्षणाच्या आधारावरच एक सेवाजेष्ठता यादी असावी, असा निर्णय होता. पालिकेतील सर्व विभागांतील पदासाठी सेवाज्येष्ठता यादी एकच आहे. मात्र, केवळ स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांसाठी दोन वेगवेगळ्या सेवाज्येष्ठता यादी करून त्यानुसार पदोन्नती दिली जात आहे.

यासंदर्भात पालिका प्रशासनाकडे 2013 पासून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, प्रशासन वेगवेगळी कारणे पुढे करून शासनाकडून मार्गदर्शन मागवत आहे. यामध्ये बराच कालावधी गेल्याने स्थापत्य विभागातील काही अभियंत्याना पदोन्नती मिळत नसल्याने अन्याय झाला आहे. पालिका प्रशासनाच्या वेगवेगळ्या सेवाज्येष्ठता यादीसंदर्भात अभियंते ढवळे व गवळी यांनी उच्च न्यायालयात 2015 ला याचिका दाखल केली. त्यावर 12 मार्चला सुनावणी झाली. त्यात स्थापत्य विभागाच्या डिग्री व डिप्लोमाधारक सर्व अभियंत्यांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी पुढील दोन महिन्यांत तयार करावी, असे आदेश न्यायालयाने शासन व पालिकेस दिले आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या 28 डिसेंबर 2017 च्या आदेशानुसार डिग्री व डिप्लोमाधारक अभियंत्यांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याचे निर्देश पालिकेस दिले गेले आहेत.

अंमलबजावणी कशी होणार?
शासन व न्यायालयाचे दोघांकडून निर्णय झाल्याने आता स्थापत्य विभागाच्या सर्व अभियंत्यांची एकत्रित सेवाज्येष्ठता यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक अभियंत्यांना पदोन्नतीचा मार्ग आता मोकळा होणार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी पुर्वलक्षी प्रभावाने होणार की आदेशापासून पुढे, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)