अभियंता भर्ती प्रकरणाचा अहवाल आता मुख्यसभेत सादर करा

महापौरांचे प्रशासनाला आदेश

पुणे : महापालिकेकडून 2016 मध्ये राबविण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता भर्ती प्रक्रीयेचा सविस्तर अहवाल पुढील महिन्याच्या मुख्यसभेत सादर करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी मुख्यसभेत दिले. मागील आठवड्यात या भर्ती प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिले आहेत. या आदेशावरून नगरसेवकांनी मुख्यसभेत प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. महापालिकेने 2016-17 मध्यतब्बल 179 जागांसाठी ही प्रक्रीया राबविली होती. तसेच या अभियंत्यांना महापालिकेत नियुक्तही करण्यात आलेले आहे. मात्र, या प्रक्रीयेत चुकीचे प्रश्‍न, प्रशासनाकडून दोन वेळा जाहीर करण्यात आलेली चुकीची निवड यादी तसेच प्रश्‍न चुकीचे असल्याने उमेदवारांच्या गुणांमध्ये करण्यात आलेला बदल यामुळे वाद निर्माण झाले होते. याची तक्रार अखेर काही उमेदवारांने राज्यशासनाकडे केली आहे.
मुख्यसभा सुरू होताच, महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षा राणी भोसले यांनी उपस्थित केला. तसेच या भरतीला स्थगिती देऊन त्याची चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली.तसेच तत्कालीन महापौरांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली असताना, त्यांना नियुक्‍त्या दिल्याचं कशा याचा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनास कोणतेही उत्तर देता आले नाही. त्यानंतर , नगरसेविका वृषाली चौधरी, नगरसेवक अजय खेडेकर, सुभाष जगताप यांनी ही बाब गंभीर असून त्याबाबत सविस्तर खुलासा करण्याची मागणी केली.त्यावेळी अतिरिक्त आयुक्त शीतल तेली उगले यांनी खुलासा केला.मात्र, त्याच्या खुलाशा नंतरही या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी या प्रकारणी प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, त्या नंतरही प्रशासनास खुलासा करता आला नाही.त्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी या भरतीचा सविस्तर अहवाल पुढील महिन्यात मुख्यसभेत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

काय आहे हे भरती प्रकरण

2016 मध्ये प्रशासनाने ही भर्ती प्रक्रीया राबविली होती. अभियंता भरती प्रकियेच्या परीक्षचे पेपर आणि त्यामधील प्रश्न आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने काढले होते. मात्र या पेपरमधील काही प्रश्नाची उत्तरांचे पर्याय चुकीचे असतानाही ते बरोबर असल्याचे दर्शवून त्यानुसार उमेदवारांना गुण देण्यात आले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, काही प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय चुकीचे असतानाही ते बरोबर दर्शवून गुण देण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यात बदल करण्यात आले होते, मात्र, त्यामुळे काही विद्यार्थ्याचे गुण वाढले तर काहींचे गुण कमी झाले होते. तक्रारदार उमेदवारांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता, त्याला आधी 106 गुण होते, मात्र उत्तरपत्रिकेतील दुरुस्तीमुळे त्याचे गुण 100 इतके झाले, त्यामुळे या उमेदवारांची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर काही उमेदवारांनी महापालिकेकडेही याबाबत तक्रारी केल्या.मात्र,प्रशासनाने काय करायचे ते करा असे सांगत या तक्रारींची साधी दखल घेण्याची तसदीही दाखविली नाही.तसेच उमेदवारांच्या तक्रारी वाढण्याची शक्‍यता लक्षात महापालिकेच्या मुख्यसभेत तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊ नयेत असे आदेश दिले असतानाही; रात्री साडेअकरा वाजता अनेक उमेदवारांना रातोरात नियुक्ती पत्र देण्यात आली होती. त्यामुळे या भर्ती बाबत सुरूवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)