अभिनेत्री स्मिता तांबे गौरीसाठी आवर्जून घरी

पिंपरी – सध्या मुंबईत राहणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे हीने प्रधिकरणातील घरी गौरी पूजनासाठी हजेरी लावली. गौरीच्या सजावटीपासून ते त्यांना विठ्ठल रुक्‍मिणी स्वरूपात साकारण्याचे काम स्मिता यांनी केले. त्यामुळे अनोख्या स्वरूपात यंदा वेगळी वेशभूषा व चेहऱ्यावर वेगळा आनंद घेऊन गौरी आल्याचं स्मिता यांनी सांगितलं.

स्मिता तांबे यांच्या लहानपणापासूनच घरात गौरी बसत असल्यामुळे गणपती गौरी नेमक्‍या कशा बसवाव्यात याचे संस्कार त्यांच्यावर झाले आहेत. त्यामुळे पूजा पाट, आरती, श्‍लोक याची बारीक सारीक माहिती त्यांना आहे. वडील वसंत येवले व आई धनश्री येवले, भाऊ अमित व बहीण प्रतिमा हे मिळून सणउत्सवात काही नवीन करण्याचा संकल्प दरवर्षी करतात. सात दिवसांचा गणपती व गौराई यांमुळे घरात चैतन्य व आनंदाचे वातावरण असल्याचे स्मिताच्या वडीलांनी सांगितले.

स्मिता तांबे या अगदी सकाळपासून लाडक्‍या गौराईसाठी घराची व गौरीची सजावट करत होत्या. गौरीला साडी नेसवण्यापासून ते सर्व शृंगार परिधान करण्यापर्यंत सर्व काम स्मिता यांनी केले. सजावट करताना जी मज्जा लहानपणी असायची तशीच मज्जा आजही सण उत्सवांना येते असे आवर्जून स्मिता यांनी सांगितले. ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचा आवडता फराळ नारळाच्या करंज्या, काजू कतली, भाकरवडी, चकली, अनारसे हे स्मिताच्या आईने घरी बनविले होते. तसेच गौरीसाठी वेण्या, गजरे, हातात फुले असा गौरीचा साज शृंगार करण्यातच स्मिता यांना अर्धा दिवस लागला.

स्मिताचे वडील वसंत येवले यांनी शंख वाजवून गौरीसमोर आर्जव केला. शंखाचा निनाद खूप सुंदर पद्धतीने झाला. गौरीसमोर कलश पूजन करण्यात आले होते, या कलशाचीही सजावट अनोख्या पद्धतीने मोत्यांच्या माळांची सजावट करून केली होती. गौरीसाठी एखाद्या मंदिराप्रमाणे मंडप करण्यात आला होता. आकर्षक रंगावली व धूप, तुपाचे दिवे लावून घरात चैतन्यमय वातावरण करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)