अभिनेत्री रविना टंडन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ‘उद्यान राजदूत’

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची “उद्यान राजदूत अर्थात पार्क ॲम्बॅसिडर” म्हणून काम करण्यास अभिनेत्री रविना टंडन यांनी मान्यता दिली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतचा प्रस्ताव श्रीमती टंडन यांना दिला होता. त्याचा स्वीकार करत स्वीकृतीचे पत्र त्यांनी वनमंत्र्यांना पाठवले आहे.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दि. १ ऑगस्ट २०१८ रोजीच्या पत्रान्वये मुंबई शहराचं फुफ्फुस म्हणून ज्या उद्यानाकडे पाहिले जाते त्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची उद्यान राजदूत होण्याची विनंती श्रीमती टंडन यांना केली होती. पत्रात त्यांनी १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाल्याचे सांगून संकल्पकाळात राज्यात लोकसहभागातून १५ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे नमूद केले होते.

श्रीमती टंडन यांना वनविकास, वन्यजीव संवर्धनातील रूची असल्याने त्या वन विभागाच्या विविध कार्यक्रमात सहभाग नोंदवत होत्या. हीच बाब लक्षात घेऊन श्री. मुनगंटीवार यांनी मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची“उद्यान राजदूत” होण्याची विनंती त्यांना केली होती. १०३ चौ.कि.मी चं मुंबईसारख्या महानगरातलं हे सुंदर जंगल भेट देणाऱ्या पर्यटकाच्या मनावर गारूड घातल्याखेरीज रहात नाही. हे शहरातलं जंगल आहे. पण शहरातील धकाधकीच्या आयुष्यात खास करून मुंबईकरांच्या जीवनाला हे वन जगण्याचा एक समृद्ध आरोग्यदायी श्वास देतं. त्यामुळेच त्याला मुंबईचं फुफ्फुस असं देखील म्हणतात.

या उद्यानात २७४ पेक्षा अधिक पक्षांच्या प्रजाती आढळतात. प्राण्यांच्या ३५, सरपटणाऱ्या आणि उभयचर प्राण्यांच्या ७८, फुलपाखरांच्या १७० प्रजाती इथे आढळतात. उद्यानात ११०० पेक्षा अधिक वृक्ष प्रजाती आहेत. उद्यानाच्या मध्यभागी बौद्धकालीन कान्हेरी गुंफा आहेत. हे जंगल मुक्तपणे विहार करणाऱ्या बिबट्यांचे देखील घर आहे.  वनाचा आनंद घेत सुरक्षित वन पर्यटन कसे करावे याचे सुंदर मार्गदर्शन इथल्या निसर्ग माहिती केंद्रातून मिळते. निसर्ग भ्रमंती सहल, पक्षीनिरीक्षण, फुलपाखरू निरीक्षण असे पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणारे, समृद्ध अनुभव देणारे उपक्रम येथे आखले जातात. उद्यानातील तंबू  संकूलामध्ये आरामदायी निवासाची व्यवस्था आहे.

उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून हाकेच्या अंतरावर एक कृत्रिम तलाव आहे. ज्यात नौकाविहाराचा आनंद ही पर्यटकांना घेता येतो. वनराणी ही या जंगलातील राणी असून पर्यटक त्यात ही बालपर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे. सिंह आणि व्याघ्र सफारीमुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा या शहरातील हरित क्षेत्रावर वाढत्या शहरीकरणाचा ताण आहे. जंगल संवर्धन आणि संरक्षणाची व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणस्नेही असलेल्या रविना टंडन यांचे काम उद्यानाच्या विकासासाठी आणि विविध उपक्रमांच्या आखणीसाठी मोलाचे सिद्ध होईल असा विश्वास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)