अभिनेत्री ममता कुलकर्णीची 20 कोटींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश

ठाणे – ठाण्यातील विशेष एनडीपीएस न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी हिची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहे. ठाणे पोलिसांनी 2016मध्ये कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. यातील मुख्य आरोपींमध्ये ममता कुलकर्णी हिचाही समावेश आहे.

एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अंमली पदार्थ तस्करी प्रकरमामध्ये ममता कुलकर्णी सुनावणीस उपस्थित न राहिल्याने मुंबईत तीन ठिकाणी असलेल्या आलिशान फ्लॅटस्‌ जप्त करण्याचे आदेश दिला होता. या तीन फ्लॅटस्‌ची किंमत सुमारे 20 कोटी रुपयांच्या घरात आहे.

विशेष सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, याबाबत अपील केल्यानंतर न्यायालयाने ममता कुलकर्णीच्या तिन्ही संपत्ती सील करण्याचा आदेश दिला आहे. तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी न्यायालयात हजर न झाल्याने ममताला फरार घोषित करण्यात आले आहे.

या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी ममता कुलकर्णीला विकी गोस्वामीसह मुख्य आरोपी निश्‍चित करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करीत तिचा समावेश होता. ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या आत्मसमर्पणाचा प्रयत्न करु, असे ठाणे पोलिसांनी सांगितले होते.

दरम्यान, ममता कुलकर्णी आणि तिचा कथित पती विकी गोस्वामी सध्या केनियात असल्याचे समजते.6 जून 2017 रोजी ठाणे न्यायालयाने गोस्वामी आणि कुलकर्णीला फरार घोषित केले होते. यानंतर ममता कुलकर्णीची संपत्ती सील करण्यासाठीबाबतचा अर्ज पोलिसांनी न्यायालयात केला होता.

न्यायालयाने ममताची संपत्ती सील करण्याचा अर्ज प्रलंबित ठेवला होता आणि दोन्ही फरार आरोपींना हजर राहण्यासाठी एक संधी दिली होती. परंतु दोघेही हजर राहण्याची कोणतीही शक्‍यता नसल्याने न्यायाधीशांनी तिची संपत्ती जप्त करण्याचा आदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)