अभिनेता अरमान कोहलीला तूर्तास दिलासा नाही

मुंबई – गर्लफ्रेंडला मारहाण केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेला आणि सध्या अटकेत असलेल्या अभिनेता अरमान कोहलीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. केवळ झालेल्या कृत्याबद्दल माफी मागून अथवा नुकसानभरपाई दिली म्हणजे केलेल्या चुकीची भरपाई होऊ शकत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने अरमानला सुनावले.

गर्लफ्रेंड नीरू रंधावाला मारहाण केल्याबद्दल अभिनेता अरमान कोहली याला लोणावळ्याहून अटक करण्यात आल्यानंतर वांद्रे न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी करताना जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर त्याच्यावतीने ज्येष्ठ वकील ऍड. सतीश माने-शिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीनाबरोबरच गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती रेवती मोहिती-ढेरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी ऍड. सतीश माने-शिंदे यांनी अरमान कोहलीला झालेल्या चुकीचा पश्‍चाताप होतोय. नीरू रंधावाल त्याने मारले नसून, चुकून धक्का लागल्याने ती जिन्यावर पडून जखमी झाली, असा दावा केला. मात्र हा दावा नीरू रंधावा हिने फोल ठरविला. जखमी अवस्थेत मलमपट्टी केलेल्या नीरूने आज हायकोर्टात हजर राहून आपण जिन्यात पडून जखमी झाल्याचा इन्कार केला.

अखेर अरमान कोहलीने झालेल्या चुकीबद्दल नीरूची माफी मागितली. तसेच तिला योग्य ती नुकसानभरपाईही दिली. झालेल्या कृत्याबद्दल दिलीगिरी व्यक्त करून यापुढे असे कृत्य पुन्हा होणार नाही, अशी लेखी हमीही न्यायालयाला दिली. याची दखल घेऊन तसेच लेखी हमी पत्र प्रतिज्ञापत्रावर सादर करा, असे निर्देश देऊन न्यायालयाने याचिकेची सुनावणी उद्या, दि. 15 जूनपर्यंत तहकूब ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)