अभिनव उपक्रम राबविल्याने एमटीडीसी मालामाल

पर्यटकांच्या उत्फुर्त प्रतिसादामुळे रिसॉर्ट आठवडाभर राहणार फुल्ल

पुणे – गझल, लोकगीते, भक्‍तीगीते, मराठमोळी गाणी, मनोरंजनाचे बहारदार कार्यक्रम आणि पर्यटकांमधील कलांना मिळत असलेली संधी यामुळे यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टमध्ये वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. महामंडळाने यंदा राबविलेल्या या अभिनव योजनेला पर्यटकांनीही भरभरून प्रतिसाद दिला असून यंदा सर्व रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत, विशेष म्हणजे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही रिसॉर्ट फुल्ल राहणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पर्यटकांचा पर्यटनाकडे कल वाढला आहे, त्यानुसार प्रत्येक वर्षाला गर्दीमध्ये अधिकच भर पडत आहे. पर्यटकांचा हा ओघ लक्षात घेऊन आणि त्यांची गरज लक्षात घेऊन त्याठिकाणचे स्थानिक हॉटेलचालक निवासाचे भाडे आणि खाद्यपदार्थांचे दर मनमानी पद्धतीने आकारत होते, त्याचा फटका अर्थातच गोरगरीब पर्यटकांना सहन करावा लागत होता. मात्र, हे वास्तव असतानाच या पर्यटकांना त्या धर्तीवर सेवा पुरविण्यास महामंडळाला अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यामुळे पर्यटकांची मागणी आणि गरज लक्षात घेऊन महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत पर्यटकांना सवलतीच्या दरात दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला पर्यटकांचाही उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून यापुढील कालावधीत या सेवेत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक दीपक हरणे यांनी दिली.

पर्यटनाच्या उत्साहात आणखी भर पडावी आणि या पर्यटकांचे मनोरंजन व्हावे यासाठी महामंडळाच्या वतीने यंदा या रिसॉर्टवर पहिल्यांदाच मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमाला अपेक्षेपेक्षाही अधिक प्रतिसाद मिळाला आहे, असे स्पष्ट करून हरणे म्हणाले, या कार्यक्रमात पर्यटक स्वत:हून आपली कला सादर करत आहेत. त्यातूनच त्यांच्या कलेला नवे व्यासपीठ निर्माण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढील कालावधीतही महामंडळाच्या वतीने अशाच प्रकारच्या अभिनव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अभिनव उपक्रमामुळेच सुट्टयांच्या कालावधीत सर्व रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत, अशी माहितीही हरणे यांनी दिली.

पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळावी आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी वैयक्‍तिक लक्ष देण्याच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यातच यावर्षी नवीन उपक्रम हाती घेतल्याने पर्यटकांना वेगळी पर्वणी मिळत आहे, अशाच पद्धतीने यापुढील कालावधीतही असेच उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे.
– दीपक हरणे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)