अभिनय हेच पहिले प्रेम…

सध्या मराठी नाटक आणि फिल्म्सच्या प्रतलावर होणारे नवनवीन प्रयोग आणि हाताळले जाणारे वेगवेगळे विषय हे आमच्या पिढीच्या कलाकारांचं सुदैव आहे. गेल्या सात वर्षांत पृथ्वी थिएटरमध्ये मी हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या प्रायोगिक नाटकांमधून काम केले आहे. अभिनयाचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेतल्यामुळे, भारतभरात केलेल्या वेगवेगळ्या नाटकांच्या प्रयोगांचे अनुभव, हाच माझ्या अभिनयाचा पाया आहे. म्हणूनच प्रवास आणि नाटक या दोन्ही गोष्टींनी मला व्यक्ती म्हणून घडविले आणि आयुष्याकडे सकारात्मकरित्या बघण्याचा दृष्टीकोन दिला आहे.

मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करून पुढे सेंट झेविर्समधून अॅडर्व्हटाइजिंग विषयात पदवी घेऊन विविध भाषांमधील नाट्य-मालिका आणि आता सिनेमातील अभिनयात मी स्थिरावते आहे. शिवाय डॉक्‍युमेंटरी फिल्म मेकिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असल्याने फिल्म मेकिंगच्या इतर विभागांमध्ये काम करायचा मला अनुभव आहेच.

आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये नावाजलेल्या ‘रिबन’ या चित्रपटाचे संवादही राघव दत्त यांच्याबरोबर मी लिहिले असून झोया अख्तरच्या “आमेर’ या शॉर्ट फिल्ममध्ये एका फुलविक्रेत्या बाईची भूमिका करतानाचा अनुभव माझ्यासाठी अगदी मोलाचा ठरला आहे. नुकत्याच गाजलेल्या “ग्रहण’ या मालिकेतील “प्रियांका’च्या भूमिकेला मराठी रसिकांची पसंती मिळाल्यानंतर आता मला स्मॉल स्क्रीनवरुन बिग स्क्रीनवर जायची संधी मिळते आहे. “पार्टी’ या सिनेमातून मी मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. हा माझा पहिलाच मराठी चित्रपट असून, यात सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, प्राजक्ता माळी आणि रोहित हळदीकर आहेत. सचिन दरेकर दिग्दर्शित या “पार्टी’त मी दिपालीची भूमिका साकारणार असून, मैत्रीच्या धम्माल नात्यावर हा सिनेमा आधारित आहे.

“ग्रहण’ या मालिकेचे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. माझ्या भूमिकेला भरभरून मिळालेलं प्रेम आणि प्रतिसाद संस्मरणीय ठरला. विशेषतः सोशल मीडियाद्वारे आलेले प्रेक्षकांचे मेसेजेस माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. माझ्या कामाकडे प्रेक्षक इतक्‍या बारकाईने बघत आहेत या जाणीवेने आपल्या कामाविषयीची जबाबदारी वाढल्यासारखी वाटली. एका बाजूला पल्लवी जोशींसारख्या प्रतिभावान, अनुभवी आणि प्रेमळ अभिनेत्रीबरोबर काम करण्याचा आनंद मिळाला. खूप खूप शिकायला मिळालं, तर दुसरीकडे योगेश देशपांडेंसारख्या गुणी अभिनेत्याबरोबर काम करताना मजाही आली.

– मंजिरी पुपाला


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)