‘अभिजात’ दर्जासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाई

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा केंद्र सरकारला इशारा

पुणे – मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून (मसाप) गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात कॅबिनेट नोटही तयार झाली आहे. परंतु केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप परिषदेने केला आहे. यावर लवकर निर्णय न झाल्यास न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

-Ads-

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी साहित्य अकादमीने यापूर्वीच शिफारस केली होती. परंतु, त्यानंतर काहीच न झाल्याने मसापने हा प्रश्‍न हातात घेतला. मसापच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठी भाषिकांच्यावतीने पत्रे पाठवण्यात आली. त्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांशी पत्रव्यवहार, मुख्यमंत्र्यांची भेट, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदारांशी पत्रव्यवहार करण्यात आला. लोकशाही मार्गाने आंदोलने करण्यात आली. तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला. मसापच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्‍न चर्चेच्या स्थानी आला. लोकसभेतही हा प्रश्‍न उपस्थित झाला. तसेच पत्रव्यवहाराच्या माध्यमातून यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयात झालेली याचिका दोन वर्षांपूर्वीच निकाली झाल्याचे स्पष्ट होऊन कॅबिनेट नोट तयार झाल्याचे सांगण्यात आले. परंतु त्यानंतर निर्णय न झाल्याने 26 जानेवारी रोजी आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि याप्रश्‍नी सातत्याने पाठपुरावा करणारे मसाप सातारा जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, मसापचे पदाधिकारी आणि मराठी भाषिकांच्या वतीने दिल्लीत आंदोलन करण्यात आले. तरीही केंद्र सरकार याप्रश्‍नी उदासीन राहिल्याचे दिसून आले त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून न्यायालयीन लढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला, तसा इशाराही पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय सांस्कृतिक खात्यास देण्यात आला. वास्तविक केंद्र सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी चालढकल करत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अन्यथा न्यायालयीन लढाई अपरिहार्य असल्याचेही परिषदेचे कार्याध्यक्ष जोशी यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)