अभयसिंहराजे ग्रंथालय अजूनही कागदोपत्रीच

प्रभात स्पेशल : ग्रंथालय चळवळ आणि वाचनसंस्कृती

सातारा – सातारा नगरपालिकेच्या 150 वर्षाची परंपरा असणाऱ्या नगर वाचनालयापासून राजकीय आकसाचा खेळ बनलेले श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले ग्रंथालय अजूनही कागदोपत्रीच आहे. मुळात या संदर्भात नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातच संबधित ग्रंथालय समितीच्या ठरावातच अनेक त्रुटी आढळल्याने या संस्थेचा ठरावच रद्द होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पालिकेची साडेआठ लाख रुपयांची पुस्तके सातारा पालिकेने तब्बल सहा वर्षानंतर भांडार विभागात जमा करून घेतली. मात्र त्या पुस्तकांचे ग्रंथालय शास्त्रानुसार त्याला वर्गीकरण संकेतांक न मिळाल्याने तब्बल पाच हजार पुस्तके वाचकांच्या हातात जाण्यापेक्षा तशीच पडून राहण्याची भीती आहे. साताऱ्याच्या उभारणीत सक्रीय योगदान देणारे विकासरत्न आमदार अभयसिंहराजे भोसले उर्फ भाऊसाहेब महाराज यांच्या नावाचा ठराव रद्द करण्याची वेळ यावी हे सातारकरांचे दुर्दैव आहे.

या ग्रंथालयाच्या आडोशाने मंगळवार तळ्यावर जे राजकीय बस्तान मांडण्याची समीकरणे मांडली गेली त्यासाठी पालिकेने तब्बल पंचेचाळीस लाखाचे व्यापारी संकुल व वाचनालयासाठी आठ लाखाची पुस्तके संबधित संस्थेच्या हवाली केली. मात्र संस्थेला ग्रंथालय चालवायचा अनुभव नसताना 2015-16 मध्येच मनोमिलनाच्या काळात वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे कारण सांगत आठ लाख रुपयांची पाच हजार दोनशे पुस्तकांची खरेदी करण्यात आली. प्रत्यक्षात स्थायी समितीत ठराव तीन लाखाचा असताना खरेदीचा मीटर आठ लाखावर पोहचवण्यात आला. एकीकडे सातारा शहरातील जिल्हा ग्रंथ महोत्सव महाराष्ट्रातल्या वाचन संस्कृतीला मार्गदर्शक ठरत असताना त्याच सातारा शहरात वाचन संस्कृतीला दंभ प्रवृत्तींची वाळवी लागवी या विषयी सातारकरांना प्रचंड वैषम्य आहे.

राजवाड्यावर अ वर्ग नगरवाचनालय असताना पाच शे मीटरच्या आत दुसरे ग्रंथालय नसावे हा नियम आहे. तेथे वाचन संस्कृतीच्या नावाखाली मनोमिलनातील राजकीय नुरा कुस्ती व्हावी. आणि सातारकरांनी ती उघडया डोळ्यांनी बघावी पुन्हा तेच आपलेच दात आपलेच ओठ बोलायचे किती आणि कोणाला ? आमची अस्मिता वाडयात ढाराढूर झोपली आहे. हीच खरी अडचणं आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)