अभद्र युतीचा तो प्रवास आठवावा!

नगर  – भारतीय जनता पक्षाला नगर महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 18 नगरसेवकांनी पठिंबा दिला. अभद्र युती, अशी टीका राज्यासह देशपातळीवर झाली. राष्ट्रवादीच्या या नगरसेवकांवर प्रदेशाध्यक्षांनी निलंबनाची कारवाई केली. राज्यात एकाचवेळी एवढी मोठी कारवाई करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात पहिल्यांदाच झाला आहे.

राष्ट्रवादीची ही कारवाई म्हणजे, तू मारल्यासारखं करत, मी रडल्यासारखं करतो, अशीच आहे, असे म्हणावे लागले. यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसने नगरसेवकांना हा निर्णय घेण्यास भाग पडणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई होणार, असे संकेत दिले आहेत. हा रोख आमदार संग्राम जगताप यांच्या दिशेने होता. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांनी जगताप यांच्या या निर्णयावर अप्रत्यक्ष टीका केला आहे. जगताप हे या नगरसेवकांच्या निर्णय प्रक्रियेत होते, असेही कळमकर यांचे म्हणणे आहे. दादांच्या या म्हणण्याला नगरसेवकांची कृती देखील दुजोरा देते. त्यासाठी 28 डिसेंबर या महापौर निवडणुकीच्या दिवसात डोकवावे लागेल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापौर पदाची निवडणूक होती. नगर-औरंगाबाद रोडवरील महापालिकेच्या कार्यालय आणि परिसरात राजकीय धुळवड रंगली होती. शिवसेनेचे नगरसेवक बसमधून आले होते. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक एकाच बसमधून एकत्र आले होते. भाजप-राष्ट्रवादी युती होणार, ही चर्चा महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशीपासून म्हणजे, 10 डिसेंबरला निकालापासूनच सुरू होती. राष्ट्रवादी-भाजप नगरसेवकांचा बसमधील तो एकत्रित प्रवास आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर होणे, हे नियोजनाप्रमाणेच घडले. एवढी मोठी राजकीय हालचाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चाणक्‍य धुरींकडून सुटणे शक्‍यच नव्हते, विशेष करून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून! शरद पवार यांना देशाचा कोणता राजकारणी काय करतो, हे पुण्यात बसल्यावरच कळते. नगरमधील राजकीय घडमोडी कळू शकत नाही, हे शक्‍यच नाही.

हे नगरकरांच्या देखील लक्षात आले आहे. शरद पवार यांनी नगर दौऱ्यात आपल्या आणि राष्ट्रवादीच्या प्रतिमेला सावरण्यासाठी कारवाईचे संकेत दिले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यानुसार नोटिसा बजावल्या आणि आता निलंबनाची कारवाई देखील केली. पक्षातून निलंबन झाले म्हणजे, नगरसेवकपद गेले, असे होत नाही. तसे पाहिले, तर नगर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजे जगताप, असे काहीसे समीकरण बनले आहे. निलंबित झालेले हे 18 नगरसेवक आणि शहर जिल्हाध्यक्ष हे राष्ट्रवादीपेक्षा जगताप यांचेच कार्यकर्ते अधिक आहेत.

त्यामुळे पक्षाने निलंबनाची कारवाई करून देखील या नगरसेवकांवर काहीही परिणाम होणार नाही, हे निश्‍चित! या सर्व राजकीय घडमोडीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा कळमकर यांनी घेतलेली भूमिका देखील जगताप यांना पूरक, अशीच आहे. कळमकर यांनी हा निर्णयापासून आपण आंधारात होतो, असे सांगून जगताप यांच्यावर सर्व काही सोपवले आहे. कळमकर यांची ही भूमिका पाहिल्यावर ती “नाट्यमय’ आणि “वठवणारी’ अधिक वाटते.

जगताप यांना राष्ट्रवादी आणून त्यांना विविध पदांवर संधी देत आमदारकीपर्यंत पोहचून, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर उभे करण्यापर्यंत दादा यांची भूमिका अग्रस्थानी आहे. असे असताना दादा या पाठिंबा निर्णयापासून अलिप्त कसे? पक्षश्रेष्ठींना देखील दादांनी अवगत कसे केले नाही? की, जगताप यांच्या भूमिकेला समर्थन करण्यासाठी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायची, अशी तर छुपी “दादा-काका’ खेळी, तर नाही ना? असे अनेक प्रश्‍न ही कारवाई उपस्थित करत आहे. सर्वसामान्य नगरकरांना मात्र ही कारवाई म्हणजे, दादा-काकांना समोरासमोर उभी टाकणारी, अशी वाटते आहे. राष्ट्रवादीत दुफळी निर्माण करणारी वाटत आहे. पण, ही कारवाई पक्षालाही परवडणारी नाही. राष्ट्रवादी पक्षाची एवढी मोठी हानी स्वीकारेल, असे वाटत नाही. या कारवाईमुळे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीच्या युतीवर काडीचाही परिणाम होणार नाही, हे देखील तेवढंच खरं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)