…अब्दुल्ला दिवाना!

– सम्राट गायकवाड

चार दिवसांपुर्वी पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. पाचपैकी तीन राज्यांमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले आणि त्या निमित्ताने आनंद व्यक्त करण्याची संधी साताऱ्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मिळाली. आनंद व्यक्त करण्यासाठी नागरिकांना किलोभर लाडू ही वाटण्यात आले. एकाबाजूला साताऱ्यात कॉंग्रेस कार्यकर्ते आनंद व्यक्त करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, राष्ट्रवादीच्या गोटात स्मशान शांतता होती.

खरंतर निकालाच्या दुसऱ्या दिवशी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस होता तरी ही ! या निमित्ताने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी भेटण्याचा योग आला. त्यावेळी त्यांना विचारले, तीन राज्यात कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला, मात्र तुम्ही साधा आंनद देखील व्यक्त केला नाही? त्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणाले, आम्ही आनंद व्यक्त केला तर उगाच, आम्हाला बेगाने शादी मे अब्दुल्ला असे येथील कॉंग्रेसवाले हिणवतील. असे त्यांनी उत्तर देताच क्षणभर विचार केला आणि त्यांचे उत्तर बहुदा बरोबरच होते या निष्कर्षापर्यंत पोहचलो. कारण, सन.2014 मध्ये देशात नरेंद्र मोदी आणि भाजपची लाट असताना सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी विरूध्द कॉंग्रेस असेच पहायला मिळाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोकसभेला राष्ट्रवादीने जवळपास खा.उदयनराजे यांना उमेदवारी द्यायचे नाही असे ठरविलेले होते. मात्र त्यावेळी कॉंग्रेस पक्ष खा.उदयनराजेंच्या मदतीला धावला आणि सहा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांनी प्रसिध्द पत्रक काढून सातारा लोकसभा मतदारसंघ हा आघाडीचा मतदार संघ आहे आणि उमेदवारीचा निर्णय घेण्याअगोर कॉंग्रेसचा विचार घेतला गेला पाहिजे असे सूचित करताना कॉंग्रेसच्यावतीने खा.उदयनराजे हेच उमेदवार असतील असे ठणकावून सांगितले. परिणामी कॉंग्रेसच्या इशाऱ्यासमोर राष्ट्रवादीला झुकावे लागले आणि अखेरीस खा.उदयनराजे यांनाच उमेदवारी द्यावी लागली होती. एकूणच खा.उदयनराजे या एकच नावावर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नाईलाजाने का होईना एकमत झालेले होते . मात्र, वाई, फलटण, माण, कराड-उत्तर या चार मतदारसंघात आज ही कॉंग्रेस विरूध्द राष्ट्रवादी असाच संघर्ष होताना दिसून येतो.

त्याचाच परिणाम म्हणून तीन राज्यात कॉंग्रेसला यश मिळाले असले तरी सहकारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका ही कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात जल्लोष सोडाच साधा आनंद ही व्यक्त केला नाही. कारण, येत्या निवडणुकांमध्ये जरी आघाडी झाली तरी बहुतांश विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरी ही होणारच आहे. साहजिकच ही बंडखोरी यश मिळविण्यासाठी कमी आणि मतदारसंघातील आपले अस्तित्व टिकविण्यासाठी असणार आहे. तर वाई, फलटण मतदारसंघामध्ये अद्याप भाजप प्रबळपणे अस्तित्व निर्माण करू शकलेले नाही. तर माण मतदारसंघात भाजपचे अस्तित्व निर्माण होत असले तरी उमेदवार कोण, यावरून संभ्रमाचे वातावरण आहे.

त्याचप्रमाणे कराड-उत्तरमध्ये भाजपकडून दोन गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि दुसरा गट निर्माण करण्यासाठी सातत्याने कॉंग्रेस नेत्यासोबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. एकूणच जिल्ह्यातील राजकीय स्थिती पाहता आठ पैकी चार विधानसभा मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुर्त आघाडी अंतर्गतच संघर्ष सुरू आहे. परिणामी येत्या काळात देशात आणि राज्यात कीती ही राजकीय स्थित्यंतरे जरी झाली तरी सातारा जिल्ह्यातील स्थिती कायम राहणार, हे नुकत्याच लागलेल्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांनी दाखवून दिले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)