अबाऊट टर्व्ह: व्हर्च्युअल “रिऍलिटी’

हिमांशू

डॉक्‍टर स्वतः आजारी पडणं ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. पण, डॉक्‍टरही माणूस आहे आणि तोही कधीतरी आजारी पडणारच. शिक्षकालाही न सुटणारं एखादं गणित असू शकतं आणि कुस्ती शिकवणारा वस्तादही एखाद्या लढतीत हरू शकतो.

-Ads-

त्याचप्रमाणं चोर पकडून देणाऱ्या पोलिसांच्या पैशावरही डल्ला मारला जाऊ शकतो. हल्ली तंत्रज्ञानामुळं हे अधिक सोपं झालंय. चेहरा दिसू नये म्हणून सीसीटीव्ही फुटेजच चोरून नेण्याइतके जर चोर “तयार’ झाले असतील, तर पोलिसांच्या खिशात हात घालायला त्यांना कितीसा वेळ लागणार? बॅंकांचे व्यवहार नेटवरून होऊ लागल्यावर तर ऑनलाइन चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातलाय.

एटीएम कार्डचं क्‍लोनिंग असो वा सिस्टिम हॅक करून मारलेला मोठ्ठा डल्ला असो, बॅंकेत ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत का, अशी सामान्य माणसाला कायम धास्ती वाटण्याजोगं वातावरण नक्कीच या मंडळींनी तयार केलंय. सामान्य माणसाचं सोडा, खुद्द पोलीसही या भीतीपासून दूर नाहीत.

मुंबईत नेमणुकीला असलेले एक कॉन्स्टेबल महाशय जेवत असताना अचानक त्यांना बॅंकेचा एसएमएस आला. शंभर रुपये डेबिट पडल्याचा तो मेसेज त्यांना फारसा महत्त्वाचा वाटला नसावा. परंतु थोड्याच वेळात 19 हजार 400 रुपये खात्यातून काढल्याचा आणखी एक मेसेज आल्यावर मात्र कॉन्स्टेबल महाशयांची भूकच मेली.

एटीएम कार्ड तर घरातच! मग पैसे काढतोय कोण? धावतपळत त्यांनी बॅंकेची जवळची शाखा गाठली. परंतु ते तिथं पोहोचेपर्यंत असेच आणखी चार-पाच मेसेज आले होते आणि एकंदर एक लाख रुपये त्यांच्या खात्यातून लंपास झाले होते. बॅंकेतल्या कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबल महाशयांना त्यांच्या कार्डच्या साह्यानं एटीएममधून व्यवहार करायला सांगितलं, तर खरं कार्डच चालेना. खातं ब्लॉक केल्याचा मेसेज स्क्रीनवर दिसायला लागला.

खात्यात उरलेली रक्कमसुद्धा जाऊ शकते, या भीतीनं कॉन्स्टेबल महाशयांनी लगेच ती चेकच्या साह्यानं काढून घेतली. त्यानंतर स्वतः नेमणुकीला असलेल्या पोलीस ठाण्यात स्वतःच तक्रार नोंदवली. कॉन्स्टेबल महाशयांचे पैसे कुणी, कुठून आणि कसे काढले, याचा तपास सुरू झाला. असा झटका बसलेले पोलीस खात्यात ते एकटेच नाहीत.

यापूर्वीही अनेकदा खुद्द पोलिसांच्याच बॅंक खात्यातून रकमा काढून घेतल्या गेल्या आहेत. 2013 मध्ये तर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयाबाहेरच्या एटीएममधूनच पोलिसांचे पैसे काढण्यात आले होते. गेल्या वर्षीसुद्धा दोन पोलिसांचा पगार खात्यात जमा झाल्या-झाल्या डेबिट पडला होता. ही माणसं दुसऱ्यांच्या खात्यावरचे पैसे परस्पर काढून घेण्यासाठी काय-काय युक्‍त्या वापरतात, त्या कशा शोधून काढतात, त्यांना भीती कशी वाटत नाही, हे सगळं अगम्य आहे.

अशी प्रकरणं बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, बुद्धिमत्तेची आपल्या देशात अजिबात कमतरता नाही. ज्या ऑनलाइन विश्‍वात देशातली बहुतांश सुस्थिर माणसं आकंठ बुडालीत, त्याच विश्‍वात हे चोरटे राहतात; पण दिसत नाहीत. गुन्हेगारांपासून समाजाचं रक्षण करणं हे पोलिसांचं काम. परंतु अपुऱ्या मनुष्यबळानिशी पोलिसांनी
जमिनीवरच्या गुन्ह्यांचा छडा लावावा की या अदृश्‍य चोरांच्या मागे धावावं? इंटरनेटमुळं जग बदलून गेल्याच्या हाकाट्या पिटणारे तुम्ही-आम्ही आपल्याच सुरक्षिततेच्या बाबतीत अजूनही एवढे उदासीन कसे?

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)