अबाऊट टर्न

संयमी खेळी

एखादा फलंदाज चार चेंडू खेळून काढतो आणि पाचव्या चेंडूवर षट्‌कार मारतो. उलटपक्षी, दुसरा एखादा फलंदाज षटकाच्या सहाच्या सहा चेंडूंवर प्रत्येकी एक धाव घेतो. परंतु लोकांच्या नजरेत भरतो तो षट्‌कार मारणारा फलंदाज. एकेक धाव घेणाऱ्या फलंदाजाचा खेळ रटाळ वाटतो. एकेक धाव काढताना टाळ्याही वाजवाव्याशा वाटत नाहीत. पण उत्तुंग षट्‌कार खेचल्यावर मात्र प्रेक्षकांना नाचावंसं वाटतं.

-Ads-

अर्थात, प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव घेणाऱ्या खेळाडूचं महत्त्व त्यामुळं कमी होत नाही. धावफलक हलता ठेवण्यात त्याचाही वाटा आक्रमक फलंदाजाइतकाच असतो. पण खरं सांगायचं, तर षट्‌कार मारून गाजणं एकंदरीत वाईटच. कधी-कधी संयमी खेळच उपयुक्त ठरतो. खात्यावर खूप धावा जमल्या की लोकांचं अचानक लक्ष जातं.

अगदी पेट्रोल-डिझेलच्या दरासारखं! सरकारने हुशारीनं इंधन दरवाढीचा धावफलक “हलता’ ठेवलाय. त्यामुळं सरकारचे दोन फायदे झालेत. एक म्हणजे, सतत धावफलक हलता राहिल्यामुळं लोकांना पेट्रोल पंपावर गेल्याखेरीज इंधन दरवाढीचा खरा फटका किती बसणार, हे जाणवत नाही. काहीजणांना तर तेही जाणवत नाही. दुसरा फायदा म्हणजे, कॉंग्रेसनं जेव्हा इंधन दरवाढीचा षट्‌कार ठोकला होता, तेव्हा स्टेडियम दणाणून सोडणारे आपणच होतो, हे सोयिस्करपणे विसरण्याची मुभा सरकारला मिळालीय. हल्ली लोक लिटरच्या हिशोबानं नव्हे, तर पैशांच्या हिशोबानं पेट्रोल घेतात; त्यामुळं दरवाढ फारशी जाणवणार नाही, अशी अतार्किक विधानं तर यापूर्वीच येऊन गेलीत. तीही आता तार्किक वाटू लागलीत.

इंधनाची दरवाढ झाली की सर्वच स्तरांवर महागाई वाढते, असं फार पूर्वीपासून आम्ही ऐकतो आहोत. अर्थात, ते योग्य की अयोग्य, हेही आता कळेनासं झालंय. डिझेलच्या वाहनांमधून मालवाहतूक केली जाते. डिझेलचे दर वाढले की मालवाहतुकीचे दर वाढतात. त्यामुळं मालाचे दर वाढतात आणि ते ग्राहकाच्या खिशातून वळते केले जातात, अशी साखळी असते म्हणे! परंतु कशाला उगीच असल्या फालतू विषयांवर चर्चा करायची? आपण “पद्मावत’ चित्रपटावर बोललेलं बरं!

कारण भाववाढ, महागाई वगैरे विषयावर बोलायला तोंड जरी उघडलं तरी “गेल्या सत्तर वर्षांत काय झालं,’ असं म्हणून कुणीतरी वस्सकन्‌ अंगावर येतो. त्यापेक्षा परवडेल तितके दिवस पेट्रोलची गाडी चालवावी. परवडेनासं झालं की राष्ट्रहितासाठी बसमधून प्रवास करावा, हे उत्तम. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक लाभ घेणं राष्ट्रहिताचं तर आहेच; शिवाय ते पर्यावरणाच्या दृष्टीनंही हिताचं आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या बाबतीत काय करावं, हे मात्र अजून समजलेलं नाही. कारण लाकडं आणून चूल पेटवावी, तर ते पर्यावरणाच्या हिताचं नाही आणि अचानक सिलिंडरवाला दारात उभा ठाकला, तरी छातीत धडकी भरते!

काही वर्षांपूर्वी पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीवरून लोक रस्त्यावर आले होते. मोकळे सिलिंडर वाजवत देशभरात आंदोलनं झाली होती. नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पडले आणि इकडे सरकारही बदललं. पण लोकांना लागलेली सवय का बदलायची, असा विचार करून वेगवेगळे कर लावून पेट्रोलचे दर “स्थिर’ ठेवले गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलानं उसळी घेण्यापूर्वीच आपल्याकडं इंधनाचे दर रोजच्या रोज बदलू लागले. याला म्हणतात संयमी खेळी… जय हो!

– हिमांशु

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)