अबाऊट टर्न : हुडहुडी 

हिमांशू 

आपल्याकडे बहुतांश लग्नं उन्हाळ्यात का होतात, या प्रश्‍नाचं आणखी एक गमतीशीर उत्तर नुकतंच सापडलंय. उन्हाळ्यात शाळांना सुट्ट्या असतात, हे कारण सर्वांना ठाऊक आहेच. अर्थात, तुळशीच्या लग्नापासून लग्नसराई सुरू होत असल्यामुळं हिवाळ्यातही लग्नं होतातच; परंतु उत्तर प्रदेशात एका नवरदेवाला जो अनुभव आला, तो पाहता बरेचसे नवरदेव लग्नासाठी घाई न करता उन्हाळ्याची वाट पाहतील, असं वाटतंय.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या राजकारणामुळं तापलेल्या वातावरणात बिचारी थंडी दुर्लक्षित होतेय, हे खरं; पण खिशात हात घालून निवांत भटकावं, इतकी यंदाची थंडी गुलाबी नाहीये. हातमोजे वगैरे घालावेच लागताहेत. पुण्यात तर काहीजणांनी थंडीला दूर ठेवण्यासाठी हेल्मेटसक्‍तीचा नियम पाळायला सुरुवात केलीय म्हणे! महाबळेश्‍वरात दवबिंदू गोठून हिमालयासारखं वातावरण तयार झालंय. कडाक्‍याच्या थंडीचा आगाऊ अंदाज वर्तवता आला नाही म्हणून हवामानशास्त्र विभाग पुन्हा एकदा टीकेचा धनी झालाय. पावसाचा अंदाज तर चुकला होताच. नंतर अंदाजाप्रमाणं जोरदार पाऊस आलासुद्धा; पण ज्या राज्यांमध्ये येईल, असं सांगितलं होतं, ती सोडून दुसऱ्याच राज्यांमध्ये अतिवृष्टी झाली. पूर्वेकडची आणि ईशान्येकडची राज्यं छत्री उघडून बसली, तर पश्‍चिमेकडच्या आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला.

यंदाचा हिवाळा फारसा कडक नसेल, असं हवामान खात्यानं म्हणायचा अवकाश… लगेच महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आली. अशातच फिरोजाबादजवळच्या एका गावात नवरदेव वऱ्हाड घेऊन आला.

मुलीकडच्या मंडळींनी वऱ्हाडाचं रीतसर स्वागत केलं. नवरदेवाचं औक्षण करताना त्याचे हात थरथरत होते. ही कंपनं कशामुळं, अशी शंका मुलीकडच्या काहीजणांना आली. त्यांनी तसं विचारलंसुद्धा! लग्न ज्यानं जुळवून आणलं होतं, तो मध्यस्थ म्हणाला, थंडीमुळं कुडकुडतोय बिचारा! विषय तिथंच संपला. परंतु जयमाला नावाचा विधी सुरू असतानासुद्धा नवरदेवाचे हात कापतच होते.

अखेर रात्री उशिरा जेव्हा कन्यादानाचा विधी झाला, तेव्हा मुलीकडच्या काही अतिचिकित्सक महिलांनी नवरदेवाला मुद्दाम चहा नेऊन दिला. कपासकट नवरदेवाचा हात इतका कापत होता की चहा सांडू लागला.

त्यानंतर मुलीकडच्यांनी पुढचे विधी रोखून धरले आणि मांडवात गहजब माजला. मुलाकडचे तावातावानं विचारू लागले, तर मुलीकडचे लोक नवरदेवाबद्दल अपुरी माहिती दिल्याचा आरोप मुलाकडच्यांवर करू लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर कडाक्‍याच्या थंडीतच पंचायत बोलावण्यात आली. नवऱ्या मुलात काहीतरी दोष आहे आणि तो लपवला गेलाय, अशी तक्रार पंचायतीसमोर करण्यात आली.

मुलाकडच्यांनी हिरीरीनं बाजू लावून धरली. पण अखेर पंचायतीनं निकाल दिला की, मुलीसाठी दुसऱ्या नवरदेवाचा शोध घ्यावा! नवरदेवाच्या हाताच्या कंपनाची अनेक कारणं असू शकतात आणि थंडी हे त्यातलं एक असू शकतं. पण लग्न मोडलं आणि वऱ्हाड हताशपणे परत गेलं. दुसरीकडे, मुरादाबाद जिल्ह्यात एक पती आपल्या पत्नीला लग्नसमारंभाला घेऊन जाऊ इच्छित होता.

परंतु पत्नीकडे गरम कपडे नव्हते म्हणून पतीनं चक्‍क चोरी केली. एरवी शनिदेवाला वाहण्यासाठी तेल मागणारा हा माणूस मांडवाऐवजी कोठडीत पोहोचला. त्याच्याकडून पोलिसांनी लेडीज कार्डिगन जप्त केला. सांगा, कशाला करावीत हिवाळ्यात लग्नं?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)