#अबाऊट टर्न: स्वागत! 

– हिमांशू 
सुस्वागतम्‌…. बाप्पा, तुमच्या आगमनाची वेळ आता खूपच जवळ आली आहे आणि आम्ही सारे पायघड्या अंथरून तुमच्या आगमनाच्या क्षणाची नेहमीप्रमाणंच आतुरतेनं वाट पाहत आहोत. उद्या तुम्ही घरात येणार; मांडवात येणार. घरी तुमच्या स्वागताची जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. फक्त तुम्हाला गाडीतून आणावं की पायीच जावं, याचा निर्णय अजून व्हायचा आहे. आम्ही असं म्हटल्याबरोबर काही जण कान टवकारतील, याची कल्पना आहे आम्हाला. परंतु आमच्या डोळ्यासमोर दुसरंतिसरं काहीही नसून केवळ पार्किंगची समस्या आहे. तुमचं स्वागत करताना पेट्रोलच्या महागाईचा वगैरे विचार तरी आमच्या डोक्‍यात येईल का? लोकांना आपल्यासारखंच जग दिसतं.
टीव्हीवरच्या चर्चा सुरू असताना सर्व पक्षांच्या प्रवक्‍त्यांना त्यांच्या-त्यांच्या सोयीचे मेसेज येत राहतात ना, तसंच हे! महागाई वगैरे गोष्टींचा विचार करण्याइतका आपला देश आता गरीब राहिलेला नाही. खरेदी दुकानातून करायची, रस्त्यावर करायची, मॉलमध्ये करायची की ऑनलाइन करायची एवढाच काय तो क्रायसिस उरलाय. यंदा थर्माकोलची आरास मनात असूनसुद्धा आम्ही करू शकत नाही, याबद्दल दिलगीर आहोत. त्यामुळं कागदी मखर ऑनलाइन मागवलंय. तुमची मूर्तीही शाडूची मिळते का, याचा बराच शोध घेतला. पण “शॉर्टेज’ आहे, असं समजल्यामुळं पर्यावरणवादी मित्रांना यावर्षी सॉरी म्हणावं लागणार.
तुमचा उत्सव जवळ आल्यावर जसा बाजार बहरतो, त्याचप्रमाणं प्रदूषण, पर्यावरण अशा शब्दांनाही बहर येतो. मग निर्णय घेताना आमची फसगत होते. एकतर टीव्हीवरच्या सीरिअल्समध्ये नेमक्‍या याच काळात खूप ट्‌विस्ट येत असतात. त्यांची संगती लावता-लावता अचानक उत्सव समोर येऊन उभा राहतो आणि धावतपळत बाजारात जावं तर शाडूच्या सगळ्या मूर्ती बुक झालेल्या असतात. मागणीपेक्षा पुरवठा अधिक असण्याच्या या काळात पुरवठ्यापेक्षा मागणी कमी असलेलं काहीतरी आहे, याचा आनंद होतो. नशीब म्हणजे, चिनी मालावर बहिष्कार घालण्याची भाषा नरम पडलीय; त्यामुळं चारदोन दिव्यांच्या माळा खरेदी करता आल्या. घरातल्या पोरांनी मित्रांच्या मदतीनं कागदाची मस्त आरास केलीय.
डॉल्बीचं काय होणार हे यावर्षीही अजून नीटसं समजलेलं नाहीये. काही जण म्हणतात, वाजवणारच… आणि पोलिस अधिकारी म्हणतात वाजवू देणार नाही म्हणजे नाही! आमच्या घराजवळचं मंडळ तुलनेनं गरीब आहे; पण वर्गणीचा सर्वाधिक हिस्सा डॉल्बीवरच खर्च करण्याची मंडळाची परंपरा आहे. नेहमीप्रमाणं यावर्षीही आम्ही न कुरकुरता वर्गणी दिलेली आहे. परंतु वर्गणीपेक्षा प्रायोजकांवर अधिक भिस्त ठेवण्याचा ठराव मंडळात झालाय, असं ऐकून आहोत. आरतीला कोणत्या सीरिअलमधल्या कोणत्या सेलिब्रिटीला बोलवायचं, यावर चर्चा सुरू आहे. दोन-तीन जणांशी संपर्कही झालाय म्हणे!
ढोलपथकात किती जणांचा समावेश असावा, यावरून यंदा वाद होण्याची शक्‍यता असल्याचं समजलं. प्रशासनानं बावन्नची मर्यादा घातलीय. हा आकडा नेमका कसा काढला, हे कळायला मार्ग नाही. बहुधा, प्रत्येक ढोलाच्या आवाजाचे डेसिबल गुणिले बावन्न बरोबर सुसह्य आवाज, असं गणित केलं गेलं असावं. ढोलपथक असो वा डॉल्बी, त्याचा आम्हाला त्रास होतो की आनंद, हा प्रश्‍न आम्हाला कुणी विचारू नये आणि विचारत नाहीच! कल न दाखवण्याची कला जोपासून कलांच्या अधिपतीचं स्वागत!

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)